अमरावती – त्रिपुरातील कथित हिंसाचाराच्या घटनेचे पडसाद अमरावतीमध्ये उमटले होते. त्या घटनेचा निषेध करण्यासाठी अमरावतीमध्ये आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनाचा निषेध करण्यासाठी हिंदूत्ववादी संघटनांनी बंद पुकारला. मात्र त्याला हिंसक वळण लागलं होतं. आता या प्रकरणी पोलिसांनी धरपकड सुरू केली आहे. अटक केलेल्यांमध्ये भाजपचे नेते आणि माजी मंत्री अनिल बोंडे यांचाही समावेश आहे. अटक केल्यानंतर त्यावेळी बोलताना ‘कितीही आवाज दाबला तरी हिंदू मार खाणार नाही’, अशी संतप्त प्रतिक्रिया अनिल बोंडे यांनी दिली आहे.
‘महाराष्ट्रात आणीबाणी सुरु झाली आहे. ज्यांनी दंगल केली त्यांना राज्य सरकार अटक करत नाही. मात्र, कितीही अवाज दाबण्याचा प्रयत्न केला तरी हिंदू मार खाणार नाही, अशी प्रतिक्रिया देतानाच, ज्यांच्या घरात तलवारी आहेत त्यांच्या घरी झाडाझडती घ्या,’ अशी मागणीही अनिल बोंडे यांनी केली आहे. दरम्यान, भाजप कार्यकर्त्यांनी दगडफेक केली नाही तरी पोलिसांकडून भाजपच्या कार्यकर्त्यांवर लाठीमार करण्यात आल्याचा आरोप बोंडे यांनी केला होता. त्यावरुन पोलिस आणि बोंडे यांच्यात शाब्दिक चकमकही पाहायला मिळाली होती.
– अटक करण्यात आलेल्या प्रमुख आरोपींचे नावे
अनिल बोंडे, (माजी कृषी मंत्री), तुषार भारतीय, (भाजप गटनेते, अमरावती महानगरपालिका), संजय कुटे, (आमदार), निवेदिता चौधरी, (भाजपध्यक्ष), सुरेखा लुंगारे, (नगरसेविका), चेतन गावंडे, (महापौर अमरावती), शिवराय कुलकर्णी, (भाजप प्रवक्ते) यांच्यासह दोन्ही गटातील जवळपास 90 जणांना अटक करण्यात आली आहे.
दरम्यान, अमरावतीत काही दुकानांना आग लावण्यात आली. रविवारी अमरावतीमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली होती. शिवाय तीन ते चार दिवसांसाठी इंटरनेटसेवा देखील बंद करण्यात आली आहे. पोलिसांनी आतापर्यंत दोन्ही गटातील जवळपास 90 जणांना अटक केली आहे.