अमरावती – खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा पुन्हा एकदा अडचणीत आले आहेत. राणा दाम्पत्यासह 14 कार्यकर्त्यांवर राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. रात्री बारा वाजेपर्यंत लाऊडस्पीकर्स लावून हनुमान चालिसा पठण आणि हनुमानाची आरती सुरु होती. रात्री दहानंतर लाऊड स्पीकर्सची परवानगी नाही आहे. तरी देखील राणा समर्थकांनी लाऊड स्पीकर सुरु ठेवले होते. त्यामुळे आता अमरावती पोलीसांनी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्यासह 14 कार्यकर्त्यांवर राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे.
अमरावती येथील शंकर नगर येथील राणा यांच्या घरासमोर रोडवर स्टेज टाकून रस्त्यावर अडथळा निर्माण केला. मध्यरात्री 12 वाजेपर्यंत पर्यंत लाऊडस्पिकर लावून कार्यक्रम घेतला. त्यामुळे नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 341, 188, 134, 135 या कलमांसह कमल 15 पर्यावरण संवर्धन अधिनियम 1986 आयपीसी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. युवा स्वाभिमानचे खासदार नवनीत राणा, आमदार रवी राणा, अजय मोरया, जयश्री मोरया, जितू दुधाने, बाळू इंगोले, प्रवीण गुल्हाने, साक्षी उमप यांच्यासह 8 ते 10 कार्यकर्ते यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्रीसमोर हनुमान चालीसाचे पठण करण्याचा निश्चय राणा दाम्पत्याने केला होता. त्यावरून त्यांना 14 दिवस मुंबईमध्ये तुरुंगात रहावे लागले होते. राणा दाम्पत्य आणि शिवसेना यांच्यात जोरदार वाद सुरू झाला होता. या घटनेनंतर तब्बल 36 दिवसांनी राणा दाम्पत्य हे अमरावतीमध्ये आले. त्यांचे विविध ठिकाणी जंगी स्वागत करण्यात आले. कार्यकर्त्यांनी त्यांच्या स्वागतासाठी एक क्विंटलचा हार घातला होता. मंत्रोच्चाराच्या गजरात राणा दाम्पत्याचा दुग्धाभिषेक करण्यात आला. यासंबंधीचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियात चांगलेच व्हायरल झाले आहेत. त्यानंतर आता पोलिसात गुन्हा दाखल झाल्याने राणा दाम्पत्य पुन्हा अडचणीत आले आहे.