अमरावती येथील उमेश कोल्हे हत्या प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक करण्यात आली आहे. इरफान शेख असं अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. हा आरोपी एक एनजीओ चालवतो आणि त्याने शमीम आणि त्याच्या मित्रांना त्याला मारण्यासाठी प्रवृत्त केले होते तसेच लॉजिस्टिक सपोर्टही दिला होता.
इरफान शेखची सध्या चौकशी सुरू आहे. इरफानने आरोपींना 10 हजार रुपये देण्याचे आणि कारमध्ये सुरक्षितपणे पळून जाण्यास मदत करण्याचे आश्वासन दिले होते अशी माहिती अमरावती एसीपी आरती सिंह यांनी दिली. उमेश कोल्हे यांची 21 जून रोजी रात्री हत्या करण्यात आली होती. या घटनेशी संबंधित सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. यामध्ये अमरावती येथील दुकानदार उमेश कोल्हे यांची शाळेच्या इमारतीजवळ दुचाकीवरून आलेल्या तीन आरोपींनी वार करून हत्या केली.
एनआयएचे पथक अमरावतीत पोहोचले
केमिस्टच्या हत्येच्या तपासासंदर्भात राष्ट्रीय तपास यंत्रणेचे एक पथक शनिवारी महाराष्ट्रातील अमरावती शहरात पोहोचले. भारतीय जनता पक्षातून निलंबित करण्यात आलेल्या नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमुळे केमिस्टची हत्या झाल्याची भीती लक्षात घेऊन केंद्राने या प्रकरणाची एनआयए चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे.
केमिस्ट उमेश प्रल्हादराव कोल्हे (54) यांची 21 जून रोजी हत्या करण्यात आली होती आणि या हत्येप्रकरणी महाराष्ट्र पोलिसांनी यापूर्वीच सहा जणांना अटक केली आहे. एनआयएकडे आता हे प्रकरण गेल्यानंतर काय निष्पन्न होणार याकडे अमरावतीसह संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेलं आहे.
मुदस्सीर अहमद उर्फ सोनू राजा शेख इब्राहिम, शारुख पठाण उर्फ बादशाहा हिदायत खान, अब्दुल तौफिक उर्फ नानू शेख तस्लीम, शोहेब खान उर्फ बुरिया साबीर खान, आतिफ रशीद आदिल रशीफ, डॉ युसूफ खान बहादूर खान अशी या आरोपींची नावे आहेत. कोल्हे यांनी भाजपच्या नुपूर शर्मा यांना पाठिंबा दिल्याचा आरोप करत सोशल मीडियावर पोस्ट केल्यामुळे त्यांची हत्या करण्यात आली. मृत उमेश कोहली याचा मुलगा संकेत कोहले याच्या तक्रारीवरून पोलिसांनी २३ जून रोजी मुदस्सीर अहमद आणि २५ वर्षीय शाहरुख पठाण या दोन आरोपींना अटक केली होती.