अकोला : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुणेदौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या स्वागताची तयारी जोरदार सुरु आहे. मात्र सध्या त्यांच्या स्वागतासाठी लावण्यात आलेल्या एका बॅनरमुळे वाद निर्माण झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी बॅनरवर पंढरपूरच्या पांडुरंगापेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो मोठा दाखवण्यावर तीव्र आक्षेप घेतला आहे.
अकोल्यात आयोजित एका कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी आपला आक्षेप नोंदवला आहे, तसेच पिंपरी चिंचवड येथे भाजपाने जाणीवपूर्वक मोदींचा फोटो पांडुरंगापेक्षा जाणीवपूर्वक मोठा दाखवून वारकरी संप्रदायाचा अवमान केला असल्याचा आरोप केला. यावेळी त्यांनी मोदींच्या तुकोबारायांच्या वेशातील फोटोवरही आक्षेप घेतला. तसेच यामागे भाजपाची आध्यात्मिक आघाडी असल्याचा आरोप केला.
भाजप कार्यकर्त्यांकडून लावण्यात आलेल्या बॅनरविषयी बोलताना मिटकरी म्हणाले, “भारतीय जनता पार्टीने आज नाटक सुरू केलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक फोटो जगदगुरू संत तुकोबारायांच्या वेशात दाखवण्यात येत आहे. त्यातून तुकोबारायांचा फार मोठा अपमान केला असल्याचा आरोप केला आहे. तसेच “दुसरीकडे ज्या पांडुरंगाला आमच्या संतांनी सर्वस्व मानलं त्या पांडुरंगाची प्रतिमा मोदींपुढे लहान करण्यात आली. यामागे भाजपाच्या आध्यात्मिक विकास आघाडीचा मेंदू आहे. भाजपाकडून वारंवार अशा पद्धतीने समाजात जातीय तेढ निर्माण करण्याचे पाप होत आहे,” असे मत अमोल मिटकरी यांनी व्यक्त केले.
“हा वारकरी संप्रदायाचा अपमान आहे. नरेंद्र मोदी निश्चित मोठे आहेत, पण ते पांडुरंगापेक्षा मोठे असू शकत नाही हा माझा वारकरी म्हणून विश्वास आहे. त्यामुळे यामागील मेंदू शोधला पाहिजे,” अशी मागणी अमोल मिटकरी यांनी केली. “मी अशा कृत्याचा निषेध करतो. नरेंद्र मोदींनी, त्यांच्या पक्षातील लोकांनी महाराष्ट्राची आणि वारकरी संप्रदायाची माफी मागावी. इथला वारकरी पांडुरंगाचा अपमान कधीही सहन करणार नाही,” असा इशाराही मिटकरी यांनी दिला.