पुणे – शिरूर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांच्याकडे 3 कोटी 10 लाख रुपयांची; तर त्यांच्या पत्नीकडे 1 कोटी 23 लाख 50 हजार रुपयांची मालमत्ता आहे. कोल्हे यांनी उमेदवारी अर्जासोबत सादर केलेल्या शपथपत्रामध्ये ही माहिती दिली आहे.
डॉ. कोल्हे यांच्याकडे रोख रक्कम 1 लाख 90 हजार रुपये, तर पत्नीकडे 1 लाख 5 हजार रुपये इतकी रोख रक्कम आहे. कोल्हे यांच्याकडे 44 लाख 8 हजार रुपयांच्या मुदतठेवी विविध बॅंकांमध्ये आहेत. तर पत्नीकडे 8 लाख 90 हजार रुपयांच्या मुदतठेवी आहेत. बॉण्ड, शेअर्स आणि म्युचूअल फंडामध्ये 4 लाख 26 हजार रुपयांची गुंतवणूक कोल्हे यांनी केली आहे. तर पोस्ट खात्याच्या योजना, एलआयसी आदी विमा कंपन्यांमध्ये 22 लाख 20 हजार रुपयांची गुंतवणूक कोल्हे यांनी केली आहे. तर पत्नीच्या नावेही 20 लाख रुपयांची गुंतवणूक पोस्ट खाती, एलआयसी यामध्ये आहे. कोल्हे यांच्याकडे 24 लाख रुपये किमतीचे वाहन आहे. तर पत्नीकडे 18 हजार किमतीची गाडी आहे. कोल्हे यांच्याकडे 2 लाख 46 हजार किमतीचे सोने आहे. तर पत्नीकडे 7 लाख 96 हजार किमतीचे सोने-चांदी आहे. कोल्हे यांनी 52 लाख 15 हजार रुपये कंपनीला दिले आहेत.
स्थावर मालमत्तेमध्ये कोल्हे यांच्याकडे नारायणगाव (कोल्हेमळा) ता. जुन्नर वडिलोपार्जित 6 एकर 33 गुंठे जमीन आहे. त्याची किंमत 66 लाख 53 हजार रुपये इतकी आहे. तसेच कोल्हेमळा येथे 336 चौरस फूट आणि 996 चौरस फूटाचे घर वडिलोपार्जित आहे. तर परेल येथे 662 चौरस फूटांची सदनिका आहे. त्याची किंमत 85 लाख 50 हजार रुपये इतकी आहे. त्याचबरोबर कोल्हे आणि त्यांच्या पत्नीच्यावर 7 लाख 44 हजार रुपयांचे गृहकर्ज आहे.