उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाची कारवाई
मंचर- अवसरी बुद्रुक-पारगाव रस्त्यावर उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने 6 हजार 264 रुपयांच्या दारूच्या बाटल्या जप्त केल्या आहेत. तसेच टेम्पो, कार आणि दुचाकी जप्त केली आहे.
पोलिसांनी ज्ञानेश्वर गावडे (वय 25, रा. गावडेवाडी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. गणेशोत्सव आणि आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात पोलीस बंदोबस्त ठेवला होता. उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाला अवसरी बुद्रुक-पारगाव रस्त्यावर बेकायदेशीरपणे दारुची वाहतूक केली जाणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार राज्य उत्पादन शुल्क पुणे येथील अधिक्षक संतोष झगडे यांच्या समवेत निरीक्षक आणि भरारी पथकाने कारवाई करीत दारुचा साठा जप्त केला.
राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाचे निरीक्षक अर्जुन पवार, दुय्यम निरीक्षक सुरज दाबेराव, अनिल सुतार, जवान महेंद्र कदम, दयानंद माने, स्वप्नील दरेकर, चंद्रकांत नाईक, सुरज घुले, प्रिया चंदनशिवे, अंकुश कांबळे आदी या कारवाईत सहभागी होते.