पर्यावरण अभ्यासकांचे मत; जलस्रोत दूषितचा प्रश्न कायमच
पुणे – नागरिकांनी घरच्या घरीच गणेशमूर्तींचे विसर्जन करावे, यासाठी महापालिकेने “अमोनियम बायकार्बोनेट’ या रसायनाचा वापर करण्याचे आवाहन केले असून, हे रसायन महापालिका स्वत: उपलब्ध करून देणार आहे. मात्र, नदीप्रदूषण टाळण्यासाठी अमोनियम बाय-कार्बोनेटचा वापराला प्रोत्साहन देताना, त्यामुळे होणाऱ्या हवा प्रदूषण आणि रासायनिक प्रदूषणाचा विचार केला जात नसल्याची भावना पर्यावरण अभ्यासकांनी व्यक्त केली आहे.
प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या (पीओपी) गणेशमूर्तींचे नदीत अथवा अन्य जलस्रोतांमध्ये विसर्जन केल्यामुळे मोठ्या प्रमाणात जलस्रोत प्रदूषित होतात. हा प्रकार टाळण्यासाठी तसेच यंदाच्या करोना स्थितीमुळे विशेष खबरदारी घेत गणेशमूर्तींचे विसर्जन घरीच करावे, असे आवाहन महापालिका प्रशासनाकडून सातत्याने केले जात आहे. पीओपीच्या मूर्तींचे घरीच विसर्जन करण्यासाठी अमोनियम बायकार्बोनेट या रसायनाचा वापर करण्यास सांगण्यात आले असून, महापालिका खुद्द नागरिकांना हे रसायन उपलब्ध करून देणार आहे.
मात्र, अमोनियम बाय-कार्बोनेटमुळे पर्यावरणाची हानी होते. या रसायनामुळे हवेचे प्रदूषण होते. तसेच, मूर्तीचा साका तसाच राहतो. या साक्यामध्ये पीओपीचे घटक तसेच रासायनिक रंग तसेच राहतात, अशावेळी त्याची विल्हेवाट कशी लावायची, याबाबत अद्यापही स्पष्टता नाही. त्यामुळेच अमोनियम बायकार्बोनेटचा वापर हा मूर्ती विसर्जनासाठी योग्य पर्याय ठरत नसल्याचे जीवितनदी संस्थेच्या शैलजा देशपांडे यांनी म्हटले आहे.
धातू, नैसर्गिक मातीच्या मूर्तीच योग्य…
गणेशोत्सवात प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीचा वापर करण्याऐवजी नैसर्गिक मातीपासून अथवा धातूपासून बनविणाऱ्या मूर्तींचा वापरच योग्य ठरतो. या मूर्तींचे नैसर्गिक विसर्जन करता येते. धातूची मूर्तीचे तर विसर्जनानंतरही पुन्हा प्रतिष्ठापना करता येते. तसेच हे धर्माला अनुषंगून आहे. त्यामुळेच जास्तीत जास्त नागरिकांनी अशाप्रकारच्या मूर्तीचा वापर करावा, असे आवाहन पर्यावरण अभ्यासकांकडून करण्यात आले होते.