अमिताभ बच्चन होणार ‘अ‍ॅलेक्‍सा’

मुंबई-  हिंदी चित्रपटसृष्टीचे महानायक अमिताभ बच्चन हे त्यांच्या अभिनयासोबतच त्यांच्या आवाजासाठीही ओळखले जातात. त्यांच्या खर्जातल्या आवाजाने त्यांची चित्रपटांची वा त्यांनी जेथे कोठे सूत्रधाराचे अथवा निवेदकाचे काम केले आहे, त्या कार्यक्रमांची उंची प्रचंड वाढली आहे. आता त्यांच्या याच आवाजाची जादू आणखी एका ठिकाणी पाहायला मिळणार आहे.

एका मिळालेल्या बातमीनुसार बच्चन आता अ‍ॅलेक्‍साचा आवाज होणार आहेत. अ‍ॅमेझॉन कंपनीने यासंदर्भात त्यांच्याशी करार केला आहे. अ‍ॅमेझॉनची व्हॉईस असिस्टंट सर्व्हिस अ‍ॅलेक्‍साला बच्चन यांच्या रूपाने पहिल्यांदाच एका भारतीय सेलेब्रिटीचा आवाज मिळणार आहे. बच्चन अ‍ॅलेक्‍सा असे त्याचे नामकरण केले जाणार आहे.

बच्चन अ‍ॅलेक्‍साच्या माध्यमातून अमिताभ विनोद, हवामानाची माहिती, कविता, शायरी ऐकवणार आहेत व त्याचसोबत सल्ला देण्याचेही काम करणार असल्याचे संबंधित बातमीत म्हटले आहे. 2021 पासून ही सेवा सुरू होणार आहे.

मोठा पडदा गाजवल्यानंतर छोट्या पडद्यावरही अमिताभ बच्चन यांचे दिमाखात आगमन झाले. त्यांची सादीरीकरणाची शैली आणि त्यांचा खास आवाज यामुळे कौन बनेगा करोडपती एका उंचीवर तर गेलाच पण बच्चन यांनी पाहता पाहता हा पडदाही व्यापून टाकला. आता अ‍ॅलेक्‍साच्या माध्यमातून ते एका वेगळ्याच भूमिकेत समोर येत आहेत. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये नक्कीच याची उत्सुकता असणार.

Leave A Reply

Your email address will not be published.