गुरुवारी रात्री अमित शहांचा गुजरात दौरा अन् शनिवारी मुख्यमंत्र्यांचा राजीनामा; वाचा पडद्यामागील राजकारण…

अहमदाबाद – गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी आज मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. गुजरात विधानसभा निवडणुकांना १५ महिन्यांचा कालावधी उरला असताना रुपाणी यांनी राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळातून आश्चर्य व्यक्त करण्यात येतंय.

राजीनाम्यानंतर भाजपपासून पाटीदार समाज दुरावत असल्याने रुपाणी यांना मुख्यमंत्रीपदावरून हटवण्यात आल्याची चर्चा सुरु झाली आहे. पाटीदार समाजाच्या काही ज्येष्ठ नेत्यांनी गुजरातचा पुढचा मुख्यमंत्री पाटीदार समाजाचा असेल असे वक्तव्य केले होते. अशातच रुपाणी यांच्या राजीनाम्यामुळे भाजपने आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हे पाऊल उचललं आहे का असा प्रश्न चर्चिला जात आहे.

अमित शाह यांचा गुजरात दौरा अन् रुपाणी यांचा राजीनामा 

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा गुरुवारी रात्री आठच्या सुमारास अचानक अहमदाबादला पोहोचले होते. त्यांच्या गुजरात भेटीबाबत कोणतीही माहिती देण्यात आली नव्हती. गुरुवारी रात्री अमित शहा आपल्या बहिणीच्या घरी गेले असले तरी ते कौटुंबिक कामानिमित्त आले असावेत, असे वाटत होते. पण आता विजय रुपाणी यांच्या राजीनाम्यानंतर अमित शाह हे कदाचित सत्ताबदलाच्या संदर्भातच गुजरातमध्ये आले होते अशी चर्चा सुरु आहे.

दुसऱ्यांदा गुजरातचे मुख्यमंत्री

26 डिसेंबर 2017 रोजी रुपाणी यांनी दुसऱ्यांदा गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. भाजपाने गुजरातमध्ये 182 पैकी 99 जागा जिंकून बहुमत मिळवले होते. विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत विधीमंडळ पक्षाचे नेते म्हणून रुपाणी आणि उपनेते म्हणून नितीन पटेल यांची निवड करण्यात आली होती.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.