अमित शहांच्या कोलकात्यामधील रोड शोवेळी तुफान राडा

भाजप आणि तृणमूलच्या कार्यकर्त्यांमध्ये जुंपली; दगडफेक अन्‌ जाळपोळ

कोलकाता  – भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्या येथील रोड शोवेळी मंगळवारी तुफान राडा झाला. भाजप आणि तृणमूल कॉंग्रेसचे कार्यकर्ते एकमेकांना भिडल्याने रोड शो पूर्णत्वास जाऊ शकला नाही. राड्यावेळी दगडफेक आणि जाळपोळीचे प्रकार घडले. दरम्यान, शहांना कुठलीही इजा पोहोचली नाही. रोड शो सुरू असताना एका महाविद्यालयाच्या वसतिगृहातून शहा यांच्या ताफ्यावर तृणमूलच्या कथित कार्यकर्त्यांनी दगडफेक केली. त्यानंतर तृणमूल आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये जुंपली. महाविद्यालयाच्या प्रवेशद्वाराबाहेर दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. तिथे लावण्यात आलेल्या अनेक दुचाकींची त्यावेळी मोडतोड करण्यात आली. त्याशिवाय, अनेक दुचाकी पेटवून देण्यात आल्या.

दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमधील संघर्ष थांबवण्यासाठी रोड शोवेळी तैनात असलेल्या पोलिसांनी शर्थीचे प्रयत्न केले. त्यांनी राडेबाजांना पांगवले. त्याआधी कलकत्ता विद्यापीठाबाहेर एका गटाने शहा यांच्या विरोधात घोषणाबाजी करत त्यांना काळे झेंडे दाखवले. तिथेही हाणामारी झाली. मात्र, पोलिसांनी तातडीने हालचाली करत परिस्थिती नियंत्रणात आणली. दरम्यान, शहा 4 किलोमीटर अंतरावर रोड शो करणार होते. मात्र, राडेबाजीमुळे रोड शो पूर्ण पल्ला गाठू शकला नाही.

तृणमूलच्या गुंडांनी माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. तृणमूलच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांचाच हिंसाचाराला चिथावणी देण्याचा प्रयत्न होता. मात्र, मी सुरक्षित राहिलो. संघर्षावेळी पोलीस मूक
प्रेक्षक बनले.

अमित शहा, भाजप अध्यक्ष

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.