नवी दिल्ली – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांचे पुत्र जय शहा (Jai Shah) एका व्हिडीओमुळे टीकेच्या केंद्रस्थानी आले आहेत. त्या व्हिडीओत ते तिरंगा हाती घेण्यास नकार दर्शवताना दिसतात. संबंधित कृतीमुळे जय विरोधकांच्या निशाण्यावर आले आहेत. आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेतील हायव्होल्टेज लढत रविवारी भारत आणि पाकिस्तानमध्ये झाली.
दुबईतील त्या चित्तथरारक सामन्यात भारताने बाजी मारली. भारताच्या विजयानंतर अनेक प्रेक्षकांनी तिरंगा फडकावत एकच जल्लोष केला. सामना पाहण्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव असणारे जय हेही स्टेडियममध्ये आवर्जून उपस्थित होते. भारताच्या विजयानंतर जय यांच्या समवेत असणाऱ्या एका व्यक्तीने त्यांच्याकडे तिरंगा सुपूर्द करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिरंगा हाती घेण्याचे जय यांनी टाळले.
त्या दृश्याचा व्हिडीओ प्रसिद्ध झाला. तो विरोधी पक्षांच्या नेत्यांनी आणि विशेषत: कॉंग्रेस नेत्यांनी सोशल मीडियावरून शेअर करत जय यांच्यावर टीकेची झोड उठवली. मेरे पास पापा हैं, तिरंगा अपने पास रखो, असे उपहासात्मक ट्विट कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी केले.
जय यांना भगवा ध्वज किंवा भाजपचा झेंडा अपेक्षित होता का, असा सवाल कॉंग्रेस नेते प्रियांक खर्गे यांनी केला. तृणमूल कॉंग्रेसचे नेते डेरेक ओब्रायन यांनी थेट अमित शहांना सवाल केले. जय यांच्या कृतीने तुमच्या राष्ट्रवादी भावना दुखावल्या का? की मुलाची कृती असल्याने ती माफ करणार, अशी विचारणा त्यांनी केली. (Amit Shah’s son refused to hold the Tricolor, Jai Shah was heavily criticized)