नवी दिल्ली – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यसभेत दोन तास भाषण केले. मात्र, महत्वाच्या मुद्द्यांवर त्यांनी मौन बाळगले. जनगणना केव्हा होणार? जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा केव्हा मिळणार याविषयी ते काहीच बोलले नाहीत, अशी टीका कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी केली.
गृह मंत्रालयाच्या कामकाजावरील चर्चेला शहा यांनी उत्तर दिले. त्यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. दहशतवाद बिल्कूल सहन न करण्याचे मोदी सरकारचे धोरण आहे. देशातून ३१ मार्च २०२६ पर्यंत नक्षलवादाचे पूर्ण उच्चाटन केले जाईल, आदी बाबींचा त्यांनी पुनरूच्चार केला.
राज्यसभेतील चर्चेवेळी विरोधकांनी जनगणनेचा मुद्दा उपस्थित केला. त्या घडामोडींचा संदर्भ देऊन राज्यसभेचे खासदार असणाऱ्या दिग्विजय यांनी शहा यांना लक्ष्य केले. जनगणना, जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा हे दोन्ही मुद्दे राष्ट्रीय हिताशी संबंधित आहेत.
त्याविषयीची माहिती शहांनी देशाला देणे अपेक्षित होते. आम्हीही त्याविषयी जाणून घेण्यास उत्सुक होतो. मात्र, राज्यसभा अध्यक्षांनी आम्हाला ते मुद्दे उपस्थित करण्याची परवानगी दिली नाही, असे त्यांनी म्हटले.