नवी दिल्ली – मोदींच्या मंत्रिमंडळात गृहखात्याचे राज्यमंत्री म्हणून नव्याने समाविष्ट करण्यात आलेले नितीश प्रामाणिक यांच्या शैक्षणिक पात्रतेवरूनही आता नव्याने प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
या आधीच्या विधानसभा निवडणूक प्रतिज्ञापत्रात त्यांनी आपली शैक्षणिक पात्रता माध्यमिक परीक्षा उत्तीर्ण अशी लिहिली असून, खासदार म्हणनू त्यांनी जी प्रोफाइल सादर केली आहे, त्यात त्यांनी आपण बीसीए म्हणजेच बॅचलर ऑफ कॉम्प्युटरची पदवी मिळवली असल्याचे म्हटले आहे. त्यांच्या या शैक्षणिक तफावतीवरून आता प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
त्यांच्यावर खुनाच्या गुन्ह्यासह अन्य काही गंभीर गुन्हे दाखल आहेत, त्यावरून या आधीच प्रश्न उपस्थित केले जात असून, गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या प्रामाणिक यांना थेट गृहखात्याची जबाबदारी दिली गेल्यानेही आश्चर्य व्यक्त केले जात आहेत.
35 वर्षीय प्रामाणिक हे पश्चिम बंगालच्या कुचबिहार मतदारसंघातील खासदार आहेत. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीतही त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्या निवडणुकीतही ते विजयी झाले आहेत, पण नंतर त्यांनी आमदारकीचा राजीनामा देऊन आपली लोकसभेतील सदस्यता कायम ठेवली आहे.
मार्चमध्ये विधानसभेची उमेदवारी दाखल करताना त्यांनी जे प्रतिज्ञापत्र सादर केले आहे, त्यात त्यांनी आपली शैक्षणिक पात्रता माध्यमिक परीक्षा उत्तीर्ण अशी लिहिली आहे, तर जुलै महिन्यात मंत्री झाल्यावर त्यांनी जे प्रोफाइल सादर केले आहे त्यात मात्र त्यांनी आपली शैक्षणिक पात्रता बीसीए पदवीधारक अशी लिहिली आहे. चार महिन्यांत त्यांची शैक्षणिक पात्रता माध्यमिक परीक्षा उत्तीर्ण ते बीसीए पदवीधारक अशी कशी बदलली, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.