पंतप्रधान मोदी हुकूमशहा वृत्तीचे? प्रश्नावर अमित शहा म्हणाले, “मी पंतप्रधान मोदींसारखा…”

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामध्ये ‘हुकूमशहा वृत्ती’ असल्याचे विरोधकांकडून करण्यात येणारे आरोप केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी फेटाळून लावले आहेत. ‘संसद टीव्ही’ला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये शहा यांनी, ‘पंतप्रधान मोदी हे उत्तम श्रोते असून ते सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या गोष्टी देखील धैर्याने ऐकून घेतात.’ असं वक्तव्य केलं.

कार्यक्रमादरम्यान, शहा यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर त्यांच्या राजकीय विरोधकांकडून करण्यात येणाऱ्या हुकूमशाही वृत्तीच्या आरोपांबाबत बोलताना अमित शहा यांनी याबाबत भाष्य केलं. “ही सर्व लोकं आमच्यावर जे आरोप लगावतायेत, ते सर्व आरोप बिनबुडाचे आहेत. मी पंतप्रधान मोदी यांच्यासारखा श्रोता पाहिला नाही.”

“जेव्हा एखाद्या समस्येबाबत बैठक होत असते तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः कमीतकमी बोलतात, इतरांचे म्हणणे ऐकून घेतात व नंतर त्याच्यावर निर्णय घेतात. आम्ही सगळे विचार करत असतो की पंतप्रधान नरेंद्र मोदी एवढा विचार कशाचा करत असतील. दोन-तीन बैठकांनंतर ते धैर्याने निर्णय घेतात.” असा दावा शहा यांनी केला.

“प्रत्येक व्यक्तीने दिलेला सल्ला घेत असताना पंतप्रधान मोदी तो व्यक्ती कोण आहे हे न पाहता त्या व्यक्तीच्या गुणवत्तेच्या आधारावरच महत्व देत असतात. त्यामुळे पंतप्रधान आपले निर्णय इतरांवर थोपवतात असे आरोप साफ खोटे आहेत. एवढंच काय तर मोदींचे टीकाकार देखील हे मान्य करतील की मंत्रिमंडळाने यापूर्वी कधीही इतक्या लोकशाही पद्धतीने काम केलेले नाही.” असं देखील शहा म्हणाले.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे पंतप्रधानांचे निकटवर्तीय असून दोन्ही नेत्यांनी सुरुवातीच्या काळात भाजपची वैचारिक मातृ संस्था असलेल्या आरएसएसमध्ये काम केले आहे. मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना शहा यांनी अनेक महत्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत.     

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.