शहांची आठवलेंना फोनाफोनी; मोदींसमवेत केंद्रीय मंत्रीपदाची शपथ घेण्याची शक्यता

नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकांमध्ये मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर आज नरेंद्र मोदी हे सलग दुसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान होणार आहेत. दिल्लीतील राष्ट्रपती भवनामध्ये नरेंद्र मोदी यांचा दैदिप्यमान शपथविविधी सोहळा आयोजित करण्यात आला असून देश-विदेशातील अनेक बडे नेते या सोहळ्यास उपस्थिती लावणार आहेत.

अशातच आता पंतप्रधानांसह कोणकोणत्या नेत्यांना मंत्रिपदाची शपथ घेण्याचे भाग्य लाभणार याबाबत अजूनही संभ्रम कायम असतानाच मंत्रिपदाची शपथ घेणाऱ्या नेत्यांबाबत एक महत्वाचे वृत्त हाती आले आहे. पंतप्रधानांसह मंत्रिपदाची शपथ घेणाऱ्या नवनिर्वाचित खासदारांना तसेच मित्रपक्षांच्या नेत्यांना भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्याकडून फोनाफोनी करण्यात आली असल्याचं वृत्त असून अमित शहांचा ‘फोन’ आलेल्या नेत्यांना सायंकाळी ५ वाजता पंतप्रधानांच्या निवासस्थानी बोलविण्यात आलेलं आहे.

भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी फोनाफोनी केलेल्या नेत्यांमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (अ) अध्यक्ष रामदास आठवले यांचाही समावेश असल्याने मोदींच्या पंतप्रधानपदाच्या शपथविधी सोहळ्यात रामदास आठवले यांना देखील मंत्रिपदाचा कार्यभार सोपविण्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. रामदास आठवले यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पहिल्या मंत्रिमंडळामध्ये सामाजिक न्याय मंत्रिपद देण्यात आलं होतं यावेळी रामदास आठवले यांच्यावर कोणत्या मंत्रिपदाचा कार्यभार सोपविण्यात येतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

अमित शहांचा फोन आलेल्या नेत्यांमध्ये सुषमा स्वराज, निर्मला सितारमन, स्मृती इराणी, सदानंद गौडा, अर्जुन मेघवाल, किरेन राजुजू, रविशंकर प्रसाद, पियुष गोयल, प्रकाश जावडेकर, रामदास आठवले, जितेंद्र सिंह, सुरेश अंगदी, बाबुल सुप्रियो, कैलास चौधरी, प्रल्हाद जोशी आणि कृष्ण रेड्डी यांचा समावेश आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here