नवी दिल्ली : परकीय भाषांचे आक्रमण होऊ नये यासाठी देशाची अशी एक राष्ट्रभाषा हवी. स्वातंत्र्यसैनिकांच्या इच्छेनुासार ती हिंदी असली पाहिजे, असे ठाम वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. दक्षिणेकडील राज्यात याचे तीव्र पडसाद उमटण्याची भीती व्यक्त होत आहे.
हिंदीला राष्ट्रभाषेचा दर्जा दिला तेव्हा त्याविरोधांत दक्षिणेकडील राज्यात तीव्र पडसाद उमटले होते. या पार्श्वभूमीवर हिंदी दिवसाच्या कार्यक्रमात शहा यांनी केलेल्या प्रतिपादनाला महत्व प्राप्त झाले आहे. आपल्या देशात बोलल्या जाणाऱ्या अनेक भाषांकडे एखाद्या ओझ्याप्रमाणे अनेक जण पाहतात. प्रत्यक्षात एकाच देशात अनेक भाषा बोलली जाणे ही एक सुंदर बाब आहे. मात्र, तरीही देशाची अशी एक भाषा असणं खूप आवश्यक आहे. हिंदी ही आपली राष्ट्रभाषा झाली पाहिजे या आग्रह आपल्या स्वातंत्र्यसैनिकांनी धरला होता. याचं कारण हेच होतं की परकिय भाषाचं आक्रमण आपल्या भाषांवर होऊ नये.
दरम्यान, असुद्दीन ओवेसी, ममता बॅनर्जी, एमके स्टॅलिन यांनी ट्विट करत या भूमिकेला विरोध जाहीर केला आहे. या सर्वांनी मातृभाषेचे महत्व अधोरेखीत केले आहे. ओवेसी म्हणाले, हिंदी ही देशातल्या प्रत्येक नागरिकाची मातृभाषा नाही. या भाषिक विविधतेचा सन्मान तुम्ही करणार नाही का? तर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही भाषेसंदर्भातलं एक ट्विट केलं आहे. त्या म्हणतात, हिंदी दिवसाच्या देशवासीयांना शुभेच्छा. आपल्या देशात अनेक भाषा आणि संस्कृती आहेत. त्यांचा सन्मान योग्य रितीने झाला पाहिजे. आपण जरी नव्या भाषा शिकलो तरीही आपल्याला आपली मातृभाषा कधीही विसरता कामा नये. दरम्यान डीएमकेचे अध्यक्ष एमके स्टॅलिन म्हणाले हिंदी भाषा आमच्यावर का थोपवली जाते आहे? अमित शाह यांनी जे वक्तव्य केलं त्याचा निषेध करतो. त्यांचं वक्तव्य आघात करणारं आहे. देशाच्या एकतेत बाधा आणणारं आहे. त्यांनी त्यांचं वक्तव्य मागे घ्यावं अशी मागणी स्टॅलिन यांनी केली आहे.