नवी दिल्ली – अमित शहांची मंत्रीमंडळात वर्णी लागल्यानंतर आता भाजपच्या अध्यक्षपदी कोणाची निवड होणार या चर्चांना ऊत आला होता. मात्र, आता याला पूर्णविराम मिळाला आहे. कारण, डिसेंबरपर्यत अमित शहाच अध्यक्षपदाची धुरा सांभाळणार आहेत.
आगामी काळात होणाऱ्या विविध राज्यांच्या विधानसभा निवडणुका संपेपर्यंत अर्थात डिसेंबर 2019 पर्यंत अमित शहा भाजपच्या अध्यक्षपदी कायम राहतील. त्यानंतर नव्या वर्षात भाजपला नवा अध्यक्ष मिळेल, असे भाजपचे वरिष्ठ नेत्यांनी माहिती दिली आहे.
नवी दिल्लीतील भाजपच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची बैठक अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडली. या बैठकीत भाजपचे सरचिटणीस आणि राज्यांतील भाजपच्या अध्यक्षांनी हजेरी लावली होती. यावेळी भाजपच्या राष्ट्रीय अध्यपदी आत्ताच कोणाची निवड करण्याबाबत तोडगा निघाला नाही. या वर्षाच्या शेवटी पक्षांतर्गत निवडणुकीच्यावेळीच राष्ट्रीय अध्यक्षपद बदलण्याचा विचार व्हावा, असे ठरले.
या बैठकीनंतर पत्रकारांना माहिती देताना भुपेंद्र यादव म्हणाले की, पक्षाने सध्या सदस्य नोंदणी मोहिमेवर लक्ष केंद्रीत केले आहे. येत्या काळात विधानसभा निवडणुकांपूर्वी भाजपच्या सदस्यसंख्येत 20 टक्क्यांनी वाढ होईल, अशी भाजपला आशा आहे. सध्या भाजपचे 11 कोटी सदस्य असून यात 20 टक्क्यांनी वाढ करण्याचे त्यांचे ध्येय आहे.
भाजपच्या अध्यक्ष पदाच्या निवडीबाबत त्यांना विचारले असता यादव म्हणाले, अमित शहा यांच्या निर्णय आणि रणनीतीमुळे भाजपला लोकसभा निवडणुकीत मोठा विजय मिळवता आला. दरम्यान, आगामी काळात हरयाणा, जम्मू आणि काश्मीर, झारखंड आणि महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका होणार आहेत. या निवडणुका भाजपसाठी आव्हान असणार आहेत.
त्यामुळे या काळात भाजपची धुरा ही अमित शहांकडेच असावी, अशी अनेक भाजप पदाधिकाऱ्यांची इच्छा आहे. त्यामुळे भाजपचे अध्यक्षपद बदलण्याचा मुद्दा मागे पडल्यांनतर प्रामुख्याने भाजपच्या सदस्य नोंदणी मोहिमेवर लक्ष केंद्रीत करण्यात आले, असे त्यांनी सांगितले.