मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे काही दिवसांपू्र्वी त्यांच्या सुनबाई आणि भाजपा खासदार रक्षा खडसे यांच्यासह दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना भेटण्यासाठी गेले होते. पण अमित शाहांनी त्यांची भेट नाकारल्याच्या चर्चाना उधाण आले आहे. या प्रकारानंतर एकनाथ खडसे यांनी स्पष्टीकरण दिले होते. अमित शाहांशी माझी फोनवरून चर्चा झाल्याचे खडसेंनी सांगितले.
दरम्यान, दिल्लीतील या सर्व घडामोडीनंतर या भेटीसंदर्भात भाजपा नेते गिरीश महाजन यांनी मोठं विधान केले आहे. याविषयी बोलताना महाजन यांनी,’एकनाथ खडसे आणि रक्षाताई खडसे केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भेटण्यासाठी दिल्लीत गेले होते. मात्र, त्यांची भेट झाली नाही. मी रक्षाताईंना फोन केल्यानंतर त्यांनीच मला ही माहिती दिली,’ असा दावा केला आहे. ते जळगावात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
पुढे बोलताना गिरीश महाजन म्हणाले, “एकनाथ खडसे आणि अमित शाहांच्या भेटीबाबत मी प्रसारमाध्यमांतूनच ऐकलं. यानंतर मी थोडीशी अधिक माहिती घेतली. अमित शाहांच्या कार्यालयाबाहेर एकनाथ खडसे आणि रक्षाताई खडसे बसल्याची माहिती मला मिळाली. मला अमित शाहांच्या कार्याबाहेरून एक फोन आला होता. यानंतर मी रक्षाताईंना फोन करून याबाबत विचारलं. तेव्हा रक्षाताईंनीच मला सांगितलं की, आम्ही येथे जवळपास तीन तास बसलो. पण आम्हाला वेळ दिला नाही किंवा अमित शाहांनी भेटायला नकार दिला, असं मला कळालं. ते अमित शाहांना भेटायला गेले होते. मात्र, त्यांच्यात भेट झाली नाही, एवढं मला निश्चित कळालं आहे, अशी प्रतिक्रिया गिरीश महाजनांनी दिली आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जीवे मारण्याची धमकी दिलेल्या प्रकरणावरही महाजनांनी भाष्य केले आहे. मुख्यमंत्र्यांनी अधिक काळजी घेण्याची गरज आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली असून खबरदारी बाळगण्याचे आदेश दिले आहेत. सध्या मुख्यमंत्री ज्या पद्धतीने सार्वजनिक कार्यक्रमात वावरत आहेत, त्यामुळे त्यांना विशेष काळजी घेण्याची गरज आहे, असेही महाजन म्हणाले.