नवी दिल्ली – सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयला फटकारल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आपच्या निशाण्यावर आले. त्या पक्षाने थेट शहांच्या राजीनाम्याची मागणी केली. सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांना जामीन मंजूर केला.
तो फैसला सुनावताना न्या. उज्ज्वल भुइयां यांनी केजरीवाल यांच्या अटकेवरून सीबीआयला फटकारले. सीबीआयने पिंजऱ्यातील पोपट या प्रतिमेतून बाहेर पडावे, अशी टिप्पणी त्यांनी केली. त्या टिप्पणीचा आधार घेऊन आपच्या नेत्यांनी शहा यांना लक्ष्य केले.
न्यायालयाची टिप्पणी केवळ सीबीआयच्या विरोधातील नसून केंद्र सरकारच्याही विरोधात जाणारी आहे. न्यायालयाने सीबीआयला पिंजऱ्यातील पोपट म्हणणे शहांविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे आहे, असे दिल्लीचे मंत्री सौरभ भारद्वाज यांनी म्हटले.
केंद्र सरकारकडून केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर केला जातो. त्या यंत्रणांनी अनेक छापे टाकले. पण, गैरमार्गाने जमवलेला एक पैसाही आढळला नाही. तरीही आपच्या अनेक नेत्यांना तुरूंगात टाकण्यात आले.
केजरीवाल यांना मिळालेला जामीन म्हणजे केंद्र सरकार, शहा, गृह मंत्रालय आणि सीबीआयला बसलेली चपराक आहे, अशी प्रतिक्रिया दिल्लीच्या आणखी एक मंत्री आतिशी यांनी दिली.