नवी दिल्ली – राजकीय धोरणकार प्रशांत किशोर आता पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल कॉंग्रेसचे राजकीय धोरण मार्गदर्शक म्हणून काम बघणार आहेत. लोकसभेसाठी 2014 साली झालेल्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळालेल्या मोठ्या विजयाचे श्रेय रणनितीकार या नात्याने प्रशांत किशोर यांना दिले जाते.
यातच आगामी पश्चिम बंगालमध्ये २०२१ मध्ये विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमी गुरुवारी प्रशांत किशोर यांनी ममता बॅनर्जी यांची भेट घेतली आणि आता विधानसभेच्या निवडणुकीसाठी बॅनर्जी यांच्यासाठी रणनितीकार म्हणून काम करण्याचे त्यांनी मान्य केले होते. यावर भाजप भाजप नेते कैलाश विजयवर्गीय भाजपकडून टीका करण्यात आली आहे. प्रशांत किशोर हे भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्यापेक्षा मोठे राजकीय रणनितीकार असूच शकत नाही, असा दावा भाजप नेते कैलाश विजयवर्गीय यांनी केला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, भाजप महासचिव विजयवर्गीय म्हणाले की, प्रशांत किशोर यांच्या तुलनेत अमित शाह मोठे राजकीय रणनितीकार आहेत. भाजप अध्यक्ष त्या शाळेचे हेडमास्तर आहेत, ज्या शाळेत प्रशांत किशोर यांनी शिक्षण घेतले. तसेच पश्चिम बंगालमधील जनतेचा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावरील विश्वास उडाला आहे. त्यामुळे ममता यांना पराभवापासून कोणताही राजकीय रणनितीकार वाचवू शकत नाही, असंही विजयवर्गीय म्हणाले.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने बंगालमध्ये ४२ पैकी १८ जागांवर विजय मिळवला. तर तृणमूल काँग्रेसने २२ जागांवर विजय मिळवला. दुसरीकडे प्रशांत किशोर यांच्या देखरेखीत आंध्रप्रदेशमध्ये वायएसआर काँग्रेसने शानदार विजय मिळवला असून विधासभेत सत्ता मिळवली. तर लोकसभा निवडणुकीत देखील घवघवीत यश मिळवले.