परभणी : जेवढा विरोध करायचा तेवढा करा. आम्ही डंके की चोट पे वक्फ बोर्डाचा कायदा मंजूर करून घेणार आहोत. सोनिया गांधींनी वीस वेळा राहुल नावाचे प्लेन निवडणुकीत लँड करण्याचा प्रयत्न केला. मात्र निवडणुकीत तुमचे राहुल नावाचे प्लेन क्रॅश होणार आहे, हे लक्षात ठेवा. हरियाणातही यांनी प्रयत्न केला, मात्र तिथेही आमचे सरकार आले, आता महाराष्ट्रातही महायुतीचे सरकार येणार, असा दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी येथील जिंतूर येथील सभेत केला.
यावेळी शहा म्हणाले, जिंतूरवासियांना सांगायला आलोय. महाराष्ट्रातील सर्व विभागात जाऊन आलो. महाराष्ट्र विधानसभेचा निकाल पाहायचा आहे का? 23 तारखेला महाविकास आघाडीचा सुपडा साफ होणार आहे, महाराष्ट्रात मोदींच्या नेतृत्वात महायुतीचे सरकार बनणार आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
अमित शहा पुढे म्हणाले, उद्धव ठाकरे यांना सांगायला आलो आहे. आघाडी सरकारने काय केले याची लिस्ट घेऊन या, जिंतूरकरांनो दहा वर्षांपर्यंत शरद पवार केंद्रात मंत्री होते, सोनिया-मनमोहन यांचे सरकार होते. 10 वर्षात महाराष्ट्राला केवळ एक लाख 91 हजार करोड रुपये मिळाले. मोदीजींनी 14 ते 24 मध्ये एक लाख 91 हजार करोडच्या समोर दहा लाख पंधरा हजार कोटी रुपये विकास निधी दिला.
अमित शहा म्हणाले, कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे म्हणाले, की अशाच गोष्टी सांगा ज्या तुम्ही करू शकतात. आमचे मोदी हे प्रत्येक स्वप्न पूर्ण करू शकणारे नेते आहेत. महायुती सरकारने लाडक्या बहिणीची योजना आणली त्याला सुप्रिया सुळे आणि उद्धव ठाकरे विरोध करत आहेत, असेही अमित शहा म्हणाले.
25 लाख रोजगार देणार
आश्वासनांचा पाढा वाचताना अमित शहा म्हणाले, आम्ही 25 लाख रोजगार देणार आहोत. 45 हजार गावांमध्ये पक्के रस्ते बनवणार आहोत. वीज निर्मिती सोलारच्या माध्यमातून करणार आहोत. 20 टक्के वीजेची बचत करणार आहोत. 50 लाख लखपती दीडी करणार आहोत. शिवाजी महाराजांनी जे किल्ले बांधले ते ऐतिहासिक आहेत. किल्ल्यांसाठी आम्ही एक प्राधिकरण करून 2 हजार कोटी रुपये खर्च करणार आहोत. आम्ही सगळे आश्वासन पूर्ण करणार याची गॅरंटी मी देतो, असे अमित शहा म्हणाले.