कॉंग्रेसला 72 वर्षांत जमले नाही; ते आम्ही 75 दिवसांत केले- अमित शहा

जम्मू-काश्‍मीरबाबतच्या निर्णयाचे जोरदार समर्थन

चंडीगढ – जम्मू-काश्‍मीरचा विशेष दर्जा हटवण्याचा निर्णय देशाच्या ऐक्‍यासाठी अतिशय महत्वपूर्ण आहे. मतपेढीच्या हव्यासातून कॉंग्रेसने ते पाऊल उचलले नाही. कॉंग्रेसच्या मागील सरकारांना 72 वर्षांत जे जमले नाही; ते आम्ही (मोदी सरकार) दुसऱ्या कार्यकाळात अवघ्या 75 दिवसांत केले, असे केंद्रीय गृह मंत्री आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी शुक्रवारी म्हटले.

शहा यांनी हरियाणाच्या जिंदमधील सभेत बोलताना जम्मू-काश्‍मीरबाबतच्या निर्णयाचे जोरदार समर्थन केले. विशेष दर्जा रद्द करण्यासाठी कलम 370 हटवण्यात आल्याने जम्मू-काश्‍मीरच्या विकासात मोठा हातभार लागेल.

तसेच, जम्मू-काश्‍मीर दहशतवादमुक्त बनेल. ते कलम हटवण्यात आल्याने जम्मू-काश्‍मीर, लेह आणि लडाखच्या प्रगतीपथावरील अडथळे दूर झाले आहेत, अशी भूमिका त्यांनी मांडली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनाच्या भाषणावेळी चिफ ऑफ डिफेन्स स्टाफ हे नवे पद अस्तित्वात आणण्याची घोषणा केली. त्याचेही स्वागत शहा यांनी केले.

चिफ ऑफ डिफेन्स स्टाफ हे पद निर्माण करण्याची शिफारस कारगिल युद्धानंतर (1999) करण्यात आली. त्यावर अनेक वर्षे निर्णय घेण्यात आला नाही. मात्र, आता त्या पदामुळे लष्कर, नौदल आणि हवाई दलातील समन्वय आणखी वाढेल. त्यातून देशाची संरक्षण क्षमता अनेक पटींनी मजबूत होईल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×