पांचगणी : जावलीचे माजी आमदार जी जी कदम यांचे सुपुत्र अमित कदम यांना सातारा-जावली विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या वतीने उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. भारतीय जनता पक्षाचे विद्यमान आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या विरोधात आता महाविकास आघाडीने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे अमित कदम यांना मैदानात उतरवले आहे.
मुंबईतील मातोश्री निवासस्थानी झालेल्या कार्यक्रमात अमित कदम यांना एबी फॉर्म देऊन अधिकृत उमेदवारी प्रदान करण्यात आली. या प्रसंगी त्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत अधिकृत प्रवेश केला. त्यामुळे सातारा-जावली विधानसभा मतदारसंघातील निवडणूक अधिकच रंगतदार होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
उमेदवारी मिळाल्यानंतर अमित कदम यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, “माजी आमदार सदाशिव सपकाळ यांच्या विशेष प्रयत्नांमुळे आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विश्वासामुळे मला ही संधी मिळाली आहे.” त्यांनी जिल्हाप्रमुख हणमंत चवरे, संपर्क प्रमुख नितीन बानगुडे पाटील आणि खासदार नितीन राऊत यांच्या सहकार्याबद्दलही आभार व्यक्त केले.
सातारा-जावली मतदारसंघात भाजप विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत होणार आहे. अमित कदम यांच्या उमेदवारीमुळे या निवडणुकीत अधिकच उत्सुकता निर्माण झाली आहे. भाजपचे शिवेंद्रराजे भोसले यांच्याविरोधात अमित कदम यांचे कडवे आव्हान स्थानिक राजकारणात मोठे बदल घडवू शकते.
या घडामोडींमुळे मतदारसंघातील निवडणूक चुरशीची होणार असून, दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्कंठा वाढली आहे. आगामी निवडणुकीत कोण बाजी मारेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.