मुंबई – मी अमितला राजकारणात आणू शकतो, लादू शकत नाही. बाप म्हणून त्याला आणण्याचे माझे काम आहे.स्वीकारायचे की नाही हे काम तुमचे आहे. स्वीकारा किंवा नाकारा. मी तुम्हाला जबरदस्ती करु शकत नाही, असे स्पष्ट करीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तरुणांना राजकारणात येण्याचे आवाहन केले.
मुंबईतील सायन रुग्णालयात वसंतोत्सवात आयोजित मुलाखतीत राज बोलत होते. त्यांनी राजकारणावर तसेच स्वतःच्या आवडीवरही मुलाखतीतून भाष्य केले. राज पुढे म्हणाले, राजकारण तुच्छ मानू नका. तसे मानून कसे जमेल. तुमचे आयुष्य राजकारणाभोवती निगडित आहे. ज्यांची राजकारणात येण्याची इच्छा असेल त्यांनी माझ्याशी संपर्क साधा. जो आवडीचा पक्ष असेल त्यात काम करा, पण राजकारणात येण्याचे टाळू नका.
राजकारणात येण्यासाठी काहीतरी करण्याची इच्छा पाहिजे. माझ्या पक्षाचे नाव समोर आणले त्यावेळी मी नवनिर्माण हा शब्द जाणीवपूर्वक घातला. कारण नवीन काही करायचे झाल्यास नवनिर्माण करायलाच हवे. त्यासाठी राजकारणाचा उपयोग केला गेला पाहिजे असं ठाकरे यावेळी म्हणाले.
सध्या ओरबाडणे सुरू
राज ठाकरेंनी राजकीय स्थितीवर भाष्य करीत सध्या ओरबाडणे सुरू आहे असे म्हटले. राजकारणात माणसे वाईट असतील पण राजकारण वाईट नाही. जर वाईट असेल तर येऊन साफ करा. नाक मुरडून चालणार नाही, असेही त्यांनी पुढे बोलताना म्हटले.