नवी दिल्ली – राजस्थानातील पिलानी येथील बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्सेस (बिटस्) मधील विद्यार्थ्यांला कॅम्पस् प्लेसमेंट मध्ये ‘डीई शॉ इंडिया लिमिटेड’कडून वार्षिक 45 लाख रुपयांचे पॅकेज मिळाले आहे. संस्थेतील 320 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना 25 लाखांपेक्षा जास्तीचे पॅकेज मिळाले आहे. या संस्थेतील 88.19 टक्के विद्यार्थ्यांना फायनल प्लेसमेंट मिळाले आहे.
बिटस् पिलानी हे भारतातील नामवंत अभियांत्रिकी महाविद्यालयांपैकी एक असून गेल्यावर्षी कॅम्पस प्लेसमेंटमधून 2194 विद्यार्थ्यांना नोकरी मिळाली होती तर यंदा करोना आणि लॉकडाऊनमुळे प्रतिकूल वातावरण असूनही या महाविद्यालयातील 2120 विद्यार्थ्यांची कँम्पस प्लेसमेंटमधून निवड झाली आहे. गेल्यावर्षीचा विचार केला तर कॅम्पस प्लेसमेंटमधील निवड फक्त 3.37 टक्क्यांनी कमी झाली आहे.
प्लेसमेंटसाठी यावर्षी महाविद्यालयात हिंदुस्थान युनिलिव्हर लि (एचयूएल), मायक्रोन आणि वनप्लस या कंपन्या प्रथमच आल्या होत्या. इलेक्ट्रॉनिक्स आणि सेमीकंडक्टर्स क्षेत्रातील क्वालकॉम, अऩालॉग डिवाईसेस, इंटेल, मॅक्झिम इंटेग्रेटेड, वेस्टर्न डिजिटल आणि एनएक्सपी या कंपन्या आल्या होत्या. त्याखेरीज कॅम्पस प्लेसमेंटसाठी आलेल्या इस्रो, जनरल इलेक्ट्रिक, व्हर्लपूल, टाटा मोटर्स, टाटा अडव्हान्स्ड सिस्टिम्स, अरूप, एक्झॉन मोबिल, केर्न आणि विस्टेऑन या कंपन्यांमध्ये विद्यार्थ्यांची निवड झाली.
त्याचबरोबर 2019-20 या शैक्षणिक वर्षाची सुरवातही चांगली झाली असून प्री प्लेसमेंट म्हणून मायक्रोसॉफ्ट, अमेझॉन, उबर, सॅमसंग (संशोधन आणि विकास), गोल्डमन सॅक या कंपन्यांनी विद्यार्थ्यांना विद्यावेतनावर घेतले आहे. जेव्हा देशभरात मोठ्या प्रमाणावर लेऑफ आणि नोकऱ्यांसाठी दिलेल्या ऑफर मागे घेणे चालू होते अशा काळात बिटस् पिलानी या शैक्षणिक संस्थेला मात्र या प्रतिकूल वातावरणाचा अगदीच कमी परिणाम अनुभवायला आला.