मुंबई : विराज प्रोफाईल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने वाडा तालुक्यातील आमगाव येथील 105 हेक्टर जमीन औद्योगिक वापरासाठी खरेदी केल्याप्रकरणी पालघर जिल्हाधिकारी यांच्या स्तरावर सुनावणी सुरू आहे अशी माहिती महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी विधानसभेत दिली.
पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील आमगाव येथील 105 हेक्टर जमीन एका जमीनदाराने इनामात मिळालेली जागा विराज प्रोफाईल प्रायव्हेट लिमिटेडला शासनाची पूर्व परवानगी न घेता विकल्याप्रकरणी विधानसभा सदस्य दौलत दरोडा यांनी प्रश्न उपस्थित केला होता.या प्रश्नाच्या चर्चेत विधानसभा सदस्य प्रकाश आबिटकर, रविंद्र वायकर यांनी भाग घेतला.
या प्रश्नाला उत्तर देताना महसूलमंत्री थोरात म्हणाले, विराज प्रोफाईल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या नावावर असलेले १०५.७७ हेक्टर क्षेत्रास महाराष्ट्र परगणा व कुळकर्णी वतन ॲक्ट 1050 च्या तरतूदी लागू असल्याने या जमिनीच्या सात बारा नोंदीनुसार या जमिनीचा उपयोग शेतीव्यतिरिक्त केल्यास बाजारभावाप्रमाणे 50 टक्के दंड भरावा लागेल अशी नोंद ठेवण्यात आली आहे. तसेच या कंपनीने औद्योगिक वापरासाठीच ही जमीन खरेदी केली असून त्याचा बिनशेती अथवा बांधकाम परवानगीसाठी अद्याप कोणताच अर्ज केलेला नाही.
शासनाच्या कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम 1948 चे कलम 63 एक-अ चा भंग केल्याप्रकरणी पालघर जिल्हाधिकारी यांच्या स्तरावर सुनावणी सुरू आहे. भोगवटादाराने 75 टक्के नजराणा भरण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत अशी माहिती महसूलमंत्री थोरात यांनी विधानसभेत दिली.