पुणे : सन 2024 च्या लोकसभा निवडणुकांमध्ये बारामती लोकसभा मतदार संघ जिंकण्यासाठी भाजपने लक्ष केंद्रीत केलेले आहे. देशातील बालेकिल्ला असलेला अमेठी मतदार संघ भाजपने जिंकला. आता आमचे लक्ष्य बारामती आहे, असा विश्वास भाजपचे बारामती लोकसभा मतदार संघाचे प्रभारी व आमदार प्रा.राम शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या दौऱ्याची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत शिंदे बोलत होते. यावेळी भाजप प्रदेश उपाध्यक्ष सुनील कर्जतकर, माजी राज्यमंत्री संजय भेगडे, राहूल शेवाळे, जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, अरुण भेगडे, ऍड. धमेंद्र खांदवे आदी उपस्थित होते.
मागील लोकसभा निवडणुकीत भाजपचे काही उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर होते. आम्ही अशा 144 मतदारसंघांची निवड केली आहे. त्यातील 16 मतदार संघ हे महाराष्ट्रातील आहे. त्यातही बारामती व शिरुर हे दोन मतदार संघ आहेत. प्रत्येक मतदार संघासाठी एका केंद्रीयमंत्र्यावर प्रभारी पदाची जबाबदारी सोपविली आहे.
राज्यातही एकेकाला प्रभारीची सूत्रे सोपविण्यात आली आहेत. त्यादृष्टीने राज्यातील अन्य ठिकाणचे प्रभारींचे दौरे पूर्ण झालेले आहेत. निर्मला सितारामन यांच्यावर बारामतीची जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे, असे शिंदे यांनी नमूद केले.+