करोनाचा सामना करण्यासाठी एक ट्रिलियन डॉलरचा खर्च
वॉशिंग्टन : करोना व्हायरसने अमेरिकेतही थैमान घातले असून आतापर्यंत 217 जणांचा बळी गेल्यानंतर आता अमेरिकन सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. लोकांना आपल्या घऱी परतण्याचा किंवा परदेशात अनिश्चित काळासाठी थांबण्याचे आदेश अमेरिकेने दिले आहेत. तसेच करोनाचा सामना करण्यासाठी सरकारने एक ट्रिलियन डॉलर खर्च करण्याची योजना जाहीर केली आहे.
करोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी अमेरिकन सरकारकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात असून लोकांच्या प्रवासावर निर्बंध आणण्यात आले आहेत. सीमारेषाही अमेरिकेकडून बंद केल्या आहेत. सर्वसामान्य जीवनावर परिणाम झाला असून शाळा तसेच अनेक व्यवसाय बंद करण्यात आले आहेत. लाखो लोक घरुन काम करण्याला प्राधान्य देत आहेत.
अमेरिकेने आंतरराष्ट्रीय प्रवास करणाऱ्या नागरिकांना स्पष्ट सांगितले आहे की, तुमची योजना विस्कळीत होऊ शकते आणि कदाचित तुम्हाला अनिश्चित काळासाठी देशाबाहेर थांबावे लागू शकते. करोना व्हायरसचा परिणाम अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवरही पडत असून स्टॉक मार्केटला मोठा फटका बसला आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी सुरुवातीला करोनाकडे गांभीर्याने न पाहिल्याचे परिणाम दिसायला लागले असून त्यांनी आता तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. अमेरिकेतील 12,260 लोकांना करोनाची लागण झालेली असून आतापर्यंत 217 जणांचा बळी गेला आहे. करोनाचे सर्वात जास्त रुग्ण वॉशिंग्टन आणि न्यूयॉर्कमध्ये आहेत. लॉस एंजेलिसमध्ये सर्व शॉपिंग सेंटर्स आणि महत्त्वाचे नसणारे सर्व व्यवसाय बंद करण्यास सांगण्यात आले आहे. तसेच नागरिकांना 10 पेक्षा जास्त लोकांनी एकत्र जमू नये असा आदेश दिला आहे.