अमेरिकेचे “चिनुक’ लवकरच भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात

नवी दिल्ली : भारतीय हवाई दलाची ताकद वाढणार असून अमेरिकेच्या चिनुक हेलिकॉप्टर्सची पहिली खेप भारतात दाखल झाली आहे. गुजरातच्या मुंद्रा विमानतळावर 4 चिनुक हेलिकॉप्टरची पहिली-वहिली बॅच पोहोचली. या चिनुक हेलिकॉप्टर्सचा लवकरच भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात समावेश करण्यात येणार आहे. सियाचीन आणि लदाख अशा ठिकाणी चिनुक हेलिकॉप्टर वायुसेनेसाठी फायदेशीर ठरणार आहे.

भारत सरकारने सप्टेंबर-2015मध्ये अमेरिकेकडून 22 ऍपॅचे हेलिकॉप्टर्स व 15 चिनुक हेलिकॉप्टर घेण्याचा करार केला आहे. याच वर्षी सर्व 15 हेलिकॉप्टर भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात दाखल होणार आहे, अशी माहिती सुत्रांकडून देण्यात आली आहे. हे चिनुक हेलिकॉप्टर्स चंदीगढ येथे नेण्यात येणार आहे. त्यानंतर हवाई दलाच्या ताफ्यात त्याचा समावेश करण्यात येईल.

बोइंग सीएच-47 चिनुक हे अमेरिकी सैन्यदलांच्या ताफ्यातील अवजड मालवाहू हेलिकॉप्टर आहे. मागे आणि पुढील अशा दोन्ही बाजूंना असलेले आणि एकमेकांच्या विरुद्ध दिशेने फिरणारे त्याचे दोन मोठे रोटर (पंखे) हे त्याचे वैशिष्टय आहे.
अमेरिकी सैन्य दलांना 1956 साली जुन्या सिकोस्रकी सीएच-37 ही मालवाहू हेलिकॉप्टर बदलण्यासाठी नवे हेलिकॉप्टर हवे होते. बऱ्याच विचारविनिमयानंतर व्हटरेल मॉडेल 114 किंवा वायएचसी-1बी नावाचे हेलिकॉप्टर स्वीकारण्याचे ठरले. या हेलिकॉप्टरचे पहिले उड्डाण 21 सप्टेंबर 1961 रोजी झाले. व्हटरेल ही कंपनी 1962 साली बोइंगने खरेदी केली. त्यानंतर या हेलिकॉप्टरचे नाव बोइंग सीएच-47 ए चिनुक असे ठेवले गेले. ते ऑगस्ट 1962 मध्ये अमेरिकी सैन्य दलांत दाखल झाले. त्यानंतर आजतागायत 40 वर्षांहून अधिक काळ ते 17 देशांच्या हवाई दलांत प्रभावीपणे कार्यरत आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)