अमेरिकन खुली टेनिस स्पर्धा: नदालचे पाचवे विजेतेपद

पाच सेटसमध्ये मेदवेदेववर मात

न्यूयॉर्क: जिद्दीला आत्मविश्‍वास व सातत्यपूर्ण कामगिरीची जोड दिली तर तिशी ओलांडल्यानंतरही ग्रॅंड स्लॅम टेनिसमध्ये श्रेष्ठ यश मिळविता येते याचा प्रत्यय राफेल नदालने घडविला. या डावखुऱ्या खेळाडूने डॅनिली मेदवेदेव या 23 वर्षीय खेळाडूवर 7-5, 6-3, 5-7, 4-6, 6-4 असा रोमहर्षक विजय मिळविला. त्याचे या स्पर्धेतील चौथे विजेतेपद असून एकूणातील 19 वे ग्रॅंड स्लॅम अजिंक्‍यपद आहे.

आर्थर ऍश स्टेडियमवर झालेल्या या उत्कंठापूर्ण अंतिम लढतीने चाहत्यांना खेळाचा निखळ आनंद मिळवून दिला. अंतिम सामन्यात नदालचे पारडे जड राहील अशी अपेक्षा होती. त्याने 2010, 2013 व 2017 मध्ये येथे अजिंक्‍यपद पटकाविले होते. नुकत्याच झालेल्या सिनसिनाटी स्पर्धेत मेदवेदेवने अजिंक्‍यपद मिळविले होते. तसेच त्याला मॉंन्ट्रियल, वॉशिंग्टन स्पर्धेत उपविजेतेपद मिळाले होते. त्यामुळे येथील अंतिम फेरीबाबत त्याने अपेक्षा उंचावल्या होत्या.

नदाल व मेदवेदेव यांनी पासिंग शॉट्‌स, फोरहॅंड व बॅकहॅंडचे परतीचे फटके, व्हॉलीज व नेटजवळून प्लेसिंग असा चतुरस्त्र खेळ केला. नदालने पहिले दोन्ही सेट घेत झकास सुरूवात केली होती. या दोन्ही सेट्‌समध्ये त्याने सर्व्हिसब्रेक मिळविला. तिसऱ्या सेटमध्ये नदालने पाचव्या गेमच्या वेळी सर्व्हिसब्रेक करण्यात यश मिळविले. मात्र लढाऊवृत्तीच्या मेदवेदेवने सलग पाच गेम्स घेत हा सेट मिळविला. नदालच्या चुकांचाही त्याला फायदा झाला. त्याने चौथ्या सेटमध्येही अव्वल दर्जाचा खेळ केला आणि नदालची सर्व्हिस तोडण्यात यश मिळविले. हा सेट घेत त्याने सामन्यात 2-2 अशी बरोबरी केली. पाचव्या सेटमध्ये नदालचा ग्रॅंड स्लॅमच्या अंतिम लढतींचा अनुभव उपयोगास आला. त्याने त्याच्या नावलौकिकास साजेसा खेळ करीत 4 तास 50 मिनिटांनंतर विजय मिळविला.


सर्व्हिसचा विलंबामुळे खेळाची लय बिघडली
कधी कधी एखादी चूकही खेळाडूंना त्रासदायक ठरते. नदालला याच अनुभवातून येथे जावे लागले. पाचव्या सेटमधील आठव्या गेममध्ये सर्व्हिसवर सामना जिंकण्याची संधी त्याला मिळाली होती. मात्र पहिली सर्व्हिस करताना नियमापेक्षा जास्त वेळ त्याने घेतल्यामुळे पंच अली निली यांनी ही सर्व्हिस नियमबाह्य ठरविली. ही सर्व्हिस त्याने गमावली. पुन्हा या सेटमधील नवव्या गेममध्येही त्याने सर्व्हिस गमावली.


नदालची ग्रॅंड स्लॅम विजेतेपदे
ऑस्ट्रेलियन खुली -2009
फ्रेंच – 2005 ते 2008, 2010 ते 2014, 2017 ते 2019
विम्बल्डन – 2008, 2010
अमेरिकन – 2010, 2013, 2017, 2019


संस्मरणीय विजेतेपद- नदाल

ग्रॅंड स्लॅमचे विजेतेपद हे माझ्यासाठी नेहमीच अविश्‍वसनीय असते. मात्र यंदाचे हे अजिंक्‍यपद माझ्यासाठी अतिशय संस्मरणीय आहे. गतवर्षी मला दुखापतीमुळे काही महिने स्पर्धात्मक टेनिसपासून दूर रहावे लागले होते. यंदा फ्रेंच स्पर्धेपाठोपाठ या स्पर्धेत विजेता झाल्यामुळे मला खूप आनंद झाला आहे. मेदवेदेव हा खूपच लढवय्या खेळाडू आहे. त्याने अफलातूनच खेळ केला व मला प्रत्येक गुणासाठी झुंजविले असे नदालने सांगितले.


चिवट लढतीचेच समाधान- मेदवेदेव

ग्रॅंड स्लॅमच्या अंतिम फेरीत प्रथमच खेळण्याचे थोडेसे दडपण होते. अर्थात नदाल हा खूप महान खेळाडू असल्यामुळे त्याच्याविरूद्ध माझा निभाव लागणे कठीणच होते. तरीही पाच सेट्‌सपर्यंत त्याला झुंजविले याचेच मला समाधान वाटत आहे. येथील उपविजेतेपदही महत्त्चाचे आहे. अजून मला भरपूर मोठी कारकीर्द करावयाची आहे. येथील अनुभव मला त्यासाठी उपयुक्त होणार आहे असे मेदवेदेवने सांगितले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)