न्यूयॉर्क – बेलारूसच्या माजी जागतिक विजेत्या व्हिक्टोरिया अझारेन्काने अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत अमेरिकेची बलाढ्य टेनिसपटू सेरेना विल्यम्स हिचा पराभव केला व अंतिम फेरी गाठली. सेरेनाने नेहमीच्या थाटात पहिला सेट सहज जिंकला.
1-6 अशा पिछाडीनंतर अझारेन्का सामना जिंकणार अशी स्थिती नव्हती. मात्र, तिने सेरेनाच्या चुकांचा लाभ घेत दुसरा सेट 6-3 असा जिंकला व सामन्यात बरोबरी केली. त्यानंतर सेरेना काहीशी निराश झाली व तेच तिच्या खेळातून सिद्धही होत होते. गुण गमावला की तिची प्रचंड चीडचीड होत होती. तिच्या याच मानसिकतेचा फायदा घेत अझारेन्काने तिसरा व निर्णायक सेट 6-3 असा सहज जिंकला व अंतिम फेरी गाठली. या फेरीत आता तिचा सामना जपानची अग्रमानांकित खेळाडू नाओमी ओसाका हिच्याशी होणार आहे.
सात वर्षांच्या खंडानंतर अझारेन्काने प्रथमच ग्रॅण्डस्लॅम स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे. यापूर्वी तिने 2013 साली याच स्पर्धेची अंतिम फेरी गाठली होती. मात्र, त्यावेळी तिला सेरेनानेच पराभूत करत विजेतेपद पटकावले होते. ग्रॅण्डस्लॅम स्पर्धाच नाही तर कोणत्याही आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत आजपर्यंत अझारेन्काला सेरेनाचा पराभव करता आलेला नव्हता.
यंदा मात्र तिने ही अपयशी कामगिरी पुसून काढली. 2013 साली अझारेन्काने ऑस्ट्रेलियन ओपन ग्रॅण्डस्लॅम स्पर्धेचे विजेतेपद पटकावले होते, त्यानंतर तिला ग्रॅण्डस्लॅम जिंकण्यात सातत्याने अपयश येत होते. आता तिने ओसाकाचा पराभव केला तर ती याही अपयशातून बाहेर येईल.