न्यूयॉर्क –अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेत ब्रिटनच्या अवघ्या 18 वर्षांच्या एम्मा रादुकानूने महिला एकेरीचे विजेतेपद मिळवताना इतिहास रचला आहे. एम्माने 19 वर्षांच्या लेला फर्नांडिसला 6-4, 6-3 असे पराभूत करून विजेतेपद पटकावले आहे. तब्बल पाच दशकांनंतर ब्रिटनला महिला एकेरीत विजेतेपद मिळाले आहे.
उपांत्य लढतीत एम्माने युनानच्या मारिया सकारीला 6-1, 6-4 असे सरळ सेटमध्ये पराभूत करत अंतिम फेरी गाठली होती. 1999 सालानंतर पहिल्यांदाच वयाच्या विशीच्या आतील खेळाडूंमध्ये लढत झाली. 1999 साली 17 वर्षीय सेरेना विल्यम्स आणि 18 वर्षांच्या मार्टिना हिंगिस यांच्यात अंतिम लढत रंगली होती.
यंदाच्या स्पर्धेत एम्माने एकाही लढतीत एकही सेट गमावलेला नाही. स्पर्धेत 18 सेट तिने जिंकले यात पात्रता फेरीतील 3 आणि मुख्य स्पर्धेतील 6 सामन्यांचा समावेश आहे.
याआधी सेरेनाने 2014 साली एकही सेट न गमावता ग्रॅंडस्लॅम विजेतेपद पटकावले होते. महिला एकेरीच्या अंतिम फेरीत धडक मारणारी एम्मा ही पात्रता फेरीतून मुख्य स्पर्धेत स्थान मिळवणारी पहिलीच खेळाडू ठरली आहे.
पहिल्या फेरीनंतर तिकीट बुक होते
एम्माची विजेतेपदाची खात्री नव्हती, त्यामुळे तिने पहिल्या फेरीची लढत झाल्यानंतर मायदेशी जाण्यासाठी विमानाचे तिकीटही बुक केले होते. मात्र, मुख्य फेरीत दुसरी फेरी गाठल्यावर तिने हे तिकीट रद्द केले. त्यानंतर तिने स्पर्धेत एकही सेट न गमावता थेट विजेतेपदाला गवसणी घातली.