न्यूयॉर्क – भारताचा अव्वल टेनिसपटू रोहन बोपण्णा याने कॅनडाचा मानांकित टेनिसपटू डेनिस शापलोव्ह याच्या साथीत खेळताना पुरुष दुहेरीची दुसरी फेरी गाठली आहे.
अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेत आता केवळ बोपण्णाचेच आव्हान कायम राहिले आहे. शुक्रवारी एकेरीतील भारताचा जिगरबाज खेळाडू सुमीत नागल याला पराभव पत्करावा लागला होता. तर, त्यापूर्वी भारताच्या दिवीज शरणला सर्बियाच्या निकोल कॅसिकसह खेळताना पराभवाचा सामना करावा लागला होता.
आता भारताच्या आशा केवळ बोपण्णावरच केंद्रित आहेत. बोपण्णा व शापलोव्ह जोडीने यजमान अमेरिकेच्या अर्नेस्टो सेकोबेडो व नोव्ह रुबीन जोडीवर 6-2, 6-4 अशी सरळ दोन सेटमध्ये मात केली व स्पर्धेची दुसरी फेरी गाठली.
हा सामना 1 तास 22 मिनिटे चालला व बोपण्णा-शापलोव्ह जोडीने प्रतिस्पर्धी खेळाडूंना संधीच दिली नाही. आता तिसऱ्या फेरीत या जोडीचा सामना सहाव्या मानांकित केविन क्रावीत्झ व आंद्रेस मेइस या जोडीशी होणार आहे.
जोकोविचची आगेकूच
सर्बियाचा जागतिक अग्रमानांकित टेनिसपटू नोवाक जोकोविच याने आपली घोडदौड कायम राखताना स्पर्धेच्या चौथ्या फेरीत प्रवेश केला. त्याने तिसऱ्या फेरीच्या सामन्यात जर्मनीच्या जॅन लेनार्ड स्ट्रफचा 6-3, 6-3, 6-1 असा सरळ तीन सेटमध्ये पराभव केला. चौथ्या फेरीत त्याचा सामना पाब्लो कॅरेनो बुस्टा याच्याशी होणार आहे. 2011, 2015 व 2018 या साली या स्पर्धेचे विजेतेपद पटकावलेल्या जोकोविचला यंदाही विजेतेपदाचा दावेदार मानले जात आहे.