दहा विवाह झाले तरी मिळेना “हवा तसा’ जोडीदार; वैतागून महिलेने केला ‘असा’ निर्धार

वॉशिंग्टन – आपल्या मनासारखा जोडीदार असायला हवा, असं जगातल्या प्रत्येकालाच विवाहापूर्वी वाटत असतं त्यात वावगंही काही नसतं. पण बहुतांशा वेळा असाच अनुभव येतो की, अनेक जोडप्यांमध्ये परस्पर-विरोधी गुण असतात. असे काही संसार टीकतातही; तर काही अल्पावधीत मोडतातही. काही जण “विवाह म्हणजे एक प्रकारची असंभवनीय तडजोड’ असं मान्य करुन “विजोड’ जोडीदाराशी जमवून घेत संसाराचा गाडा पुढे रेटतातही. शिवाय आयुष्याच्या जोडीदाराच्या गाठी स्वर्गात मारलेल्या असतात, असं सांगत अनेक जण स्वत:ची समजूतही काढतात.

मात्र, अमेरिकेतील कॅसी नामक महिलेला दहा वेळा विवाह करुनही आपल्या मनासारखा जोडीदार न मिळाल्यानं निराशा आली आहे. शिवाय, आता मनाजोगता जोडीदार मिळेपर्यंत आपण नवनवी लगीनगाठ बांधत राहणार असल्यानं, कॅसी आपोआपच बातम्यांचा विषय झाली आहे. तिचा “मिस्टर परफेक्‍ट’चा शोध अजूनही सुरु असल्याचे तिच्या सोशल मिडीयातल्या पोस्ट्‌सवरुन समजते आहे.

कॅसीच्या दहा विवाहांपैकी सर्वात दीर्घ काळाचा विवाह आठ वर्षांचा असून सर्वात कमी कालावधीचा विवाह सहा महिन्यांचा होता. एक लघु उद्योजक असलेल्या कॅसीला तिच्या आयुष्याच्या जोडीदारामध्ये नक्की काय हवे आहे, कोणते गुण त्याच्याकडे असले पाहिजेत, हे अद्याप पूर्णांशाने स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे रॉकस्टार ते धर्मोपदेशकांपर्यंत विविध वर्गांतील तिच्या दहाही जीवनसाथी पुरुषांना हे कोडे आजही आहे, की कॅसीला नक्की शोध आहे तरी कशाचा?

नुकत्याच एका टॉक शो मध्ये एका मुलाखतकाराने कॅसीला विचारले की, दहा जोडीदार बदलूनही तुला हवा तसा जोडीदार मिळत नसल्याचे समजूनही तू नव्याने आयुष्याचा जोडीदार शोधते आहेस; याबद्दल तुला कसेतरीच वाटत नाही का? त्यावर कॅसी म्हणाली की, चेष्टा-कुचेष्टा आणि आनंद-सुख याच्या पलिकडे मी याबाबतीत गेले असून, जोपर्यंत मला मनाजोगता जोडीदार मिळत नाही, तोपर्यंत विवाह करत राहण्याचा निर्धार मी केला आहे.

त्यानंतर, कॅसीने इतर 7 विवाहांबद्दलही या कार्यक्रमात चर्चा केली आणि आपण आता आपला दहावा विवाह मोडण्याच्या निर्णयाप्रत आल्याचे तिने सांगितले. माझ्यावर सर्वार्थाने प्रेम करणारा माणूस मला अजूनही मिळालेला नाही, अशी तिची भावना झालेली आहे.

माझ्या आयुष्यात आलेल्या प्रत्येक जोडीदारावर मी नि:स्वार्थ प्रेम केले; पण तसे प्रेम मला त्यांच्याकडून मिळाले नाही, अशी कॅसीची तक्रार आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.