नवी दिल्ली – करोनावर लस विकसित करण्याचे प्रयत्न जगभरात सुरू आहेत. त्याकरता स्पर्धाही सुरू झाली आहे, कारण सगळ्यांनाच देशांना लस हवी आहे. आतापर्यंत लशीच्या या रेसमध्ये ऑक्स्फर्ड ऍस्ट्रोझेनेकाची लस आघाडीवर होती. मात्र आता ते तिसऱ्या क्रमांकावर गेले असून अमेरिकेच्या फायझर कंपनीची लस सगळ्यांत अगोदर बाजारात येईल असा दावा केला जातो आहे.
फायझर आणि बायोएनटेक संयुक्तपणे ही लस विकसित करत असून ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात अथवा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात ही लस येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
या लशीच्या क्लिनिकल चाचण्या झाल्या आहेत. त्यांचा काय परिणाम होतो, याचा अभ्यास पुढच्या महिन्याच्या सुरूवातीच्या टप्प्यात पूर्ण होणार आहे. त्यानंतर आपात्कालीन स्थिती ध्यानात घेत विशेष बाब म्हणून या लशीला बाजारात आणण्याची परवानगी अमेरिकेकडून दिली जाउ शकते.
करोनाच्या लशीच्या रेसमध्ये दुसऱ्या क्रमांकावर अमेरिकेचीच मॉडर्ना ही कंपनी आहे. त्यांच्याही चाचण्यांचा तिसरा टप्पा पूर्ण झाला आहे. डिसेंबर महिन्यात या चाचण्यांचे निष्कर्ष हाती येण्याची शक्यता आहे. त्यानंतर डिसेंबर महिन्यात लगेचच अथवा जानेवारी 2021 मध्ये ही लस बाजारात आणली जाणार आहे.
एका रूग्णावर लस दिल्यानंतर विपरित परिणाम झाल्यानंतर ऑक्स्फर्ड ऍस्ट्रोझेनेकाच्या चाचण्या मध्यंतरी थांबवण्यात आल्या होत्या. त्यानंतर त्या पुन्हा सुरू करण्यात आल्या. दरम्यानच्या काळात अन्य कंपन्यांनी मुसंडी मारली आहे.
दरम्यान, रशिया आणि चीनकडूनही लस बाजारात आणण्याचे जोरदार प्रयत्न सुरू असून त्यांनीही दावे केले आहेत. मात्र या दोन्ही देशांच्या लशींनी अद्याप तिसरा टप्पा पूर्ण केला नसल्याचेही दावे करण्यात आले आहेत.
भारतातही हैदराबादची भारत बायोटेक आणि झायडस कॅडीला या दोन कंपन्या लस तयार करण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार भारत बायोटेकने आघाडी घेतली आहे.