वॉशिंग्टन – जगातील सर्वात मोठी महासत्ता असलेल्या अमेरिकेचे लष्कर सध्या जगातील सर्वात मोठे आणि शक्तिशाली लेझर वेपन बनवण्याच्या तयारीत आहे. हे लेझर वेपन तीनशे किलोवॅट क्षमतेचे असून पुढील वर्षी त्याची चाचणी केली जाणार आहे. जनरल ऍटोमिक इलेक्ट्रोमॅग्नेटिक सिस्टीम आणि बोईंग कंपनी यांच्या संयुक्त प्रयत्नातून हे शक्तिशाली वेपन आकारात येणार आहे.
या शक्तिशाली लेझर वेपनचा आकार साधारण एका कंटेनरचा असून ते एका मोठ्या ट्रक वर ठेवण्यात येणार आहे. साधारणपणे लष्करातर्फे वापरण्यात येणाऱ्या लेझर गन किंवा शस्त्रे 30 ते 100 किलोवॅट क्षमतेची असतात. पण हे तीनशे किलो वॅट क्षमतेचे लेझर वेपन हे आतापर्यंतचे सर्वात मोठे आणि शक्तिशाली लेझर वेपन ठरणार आहे.
अमेरिकन नौदलाने 2014 मध्ये पहिल्यांदा लेझर वेपन तयार केले होते. याची क्षमता फक्त 30 किलो वॅट होती. आता हे नवीन लेझर वेपन त्याच्या दहापट क्षमतेचे आहे. या लेझर वेपनचा वापर करून आकाशात उडणारे ड्रोन हेलिकॉप्टर छोटी विमाने क्षणात खाक करता येणार आहेत.
आकाशातून येणाऱ्या संकटाशी मुकाबला करण्यासाठी या खास लेझर वेपनची निर्मिती करण्यात येणार आहे. दहशतवादी हल्ल्यापासून बचाव करण्यासाठी किंवा युद्धकालीन परिस्थितीमध्ये आकाशातून होणाऱ्या छोट्या विमाने किंवा ड्रोनच्या हल्ल्यापासून बचाव करण्यासाठी लेझर गन सर्वात महत्त्वाचे अस्त्र ठरणार आहे.