भारतासाठी दिलासादायक बातमी! अमेरिकेत झालेले सत्तांतर ठरणार नाही ‘तापदायक’

वॉशिंग्टन – कोणत्याही देशात सामान्यत: सत्तांतर झाले की निती बदलते. परराष्ट्र व्यवहार धोरणाच्या संदर्भात मुळ ढाच्याला शक्‍यतो हात लावला जात नाही. त्या अनुशंगाने फार व्यापक बदल केले जात नाहीत. मात्र प्रत्येक राष्ट्राच्या संदर्भात आपली बाजू पडताळून थोडेफार फेरफार निश्‍चित केले जातात.

या पार्श्‍वभूमीवर भारतासाठी एक दिलासादायक बातमी आहे. ती म्हणजे अमेरिकेत झालेले सत्तांतर भारताला फार तापदायक ठरणार नसल्याचे दिसते. त्याला कारण ज्यो बायडेन हे आता तेथे जानेवारी महिन्यात देशाची धुरा स्वीकारतील. डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव झाला आहे. मात्र काही झाले असले तरी भारत आमचा महत्वाचा सहकारी आहे व त्या देशासोबतचे आमचे संबंध बदलणार नाहीत, अशी ग्वाही बायडेन यांच्या पक्षाच्या एका महत्वाच्या सदस्याने दिली आहे.

यासंदर्भात बोलताना डेमोक्रॅटीक पक्षाचे संदस्य राजा कृष्णमूर्ती म्हणाले की, भारत आणि चीन यांच्या संदर्भात गलवान भागातल्या ज्या बातम्या येत आहेत, त्या जर खऱ्या असतील तर हे चीथावणी देणारे पाउल आहे. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर केला जाणारा एकतर्फी बदल अमान्य असेल. चीनने दक्षिण चीन समुद्रात एक बेट तयार करून एकतर्फी वस्तुस्थिती बदलण्याचा प्रयत्न केला आहे. हा तसाच प्रकार आहे.

कृष्णमूर्ती म्हणाले की, भारताबाबत आमचे अगोदरचे डेमोक्रॅटीक अथवा रिपब्लिकन पक्षाचे जे अध्यक्ष झाले आहेत व त्यांनी जे धोरण स्वीकारले आहे, तेच यापुढे कायम राहील. या क्षेत्रात आम्ही भारतासोबत उभे आहोत. शेजारी राष्ट्रांकडून भारताच्या विरोधात केल्या जाणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या सैन्य कारवाईला आमचा विरोध असेल.

ते पुढे म्हणाले की, उपग्रहांद्वारे चीनच्या हालचालींसंदर्भात जी माहिती मिळाली आहे, त्यात काही छायाचित्रांचाही समावेश आहे. मात्र अमेरिकेतील अगोदरचे ट्रम्प प्रशासन अथवा आता येणारे बायडेन प्रशासन हे भारत या आमच्या सहकाऱ्याच्या सोबत उभे आहे.

भारत, जपान, ऑस्ट्रेलिया आणि अमेरिका यांनी मलबार येथे केलेल्या सामूहिक अभ्यासाचा संदर्भत देत ते म्हणाले की, लोकशाही राष्ट्रे परस्परांसोबत उभे राहतील व नियमांवर आधारित आंतरराष्ट्रीय व्यवस्थेचे समर्थन करतील याचे हे स्पष्ट संकेत आहेत. बायडेन हे भारताचे जुने मित्र असून भारतीय वंशाच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांच्यासह ते कायम भारतासोबत राहतील अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.