अमेरिका आता 1 नंबरचा करोनाग्रस्त देश

न्यूयॉर्क  – जगातील ज्या देशांमध्ये करोनाची लागण झाली आहे, त्यात सर्वाधिक रुग्ण असलेला देश म्हणून अमेरिकेची आज अधिकृतरित्या नोंद झाली आहे. त्या देशात करोनाची तब्बल 85 हजार 88 रुग्णांना लागण झाली आहे. 33 कोटी लोकसंख्येच्या या देशाने करोना रुग्णांच्या संख्येबाबत आता चीनलाही मागे टाकले आहे. त्यामुळे अमेरिकेतील करोनाची स्थिती चिंताजनक झाली आहे, असे सांगण्यात येत आहे. त्या खालोखाल इटलीचा नंबर लागत असून तेथे करोनाचे 80 हजार 539 रुग्ण आढळून आले आहेत. काल एका दिवसात अमेरिकेत तब्बल 16 हजार जणांना करोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

तथापि, चीन किंवा इटलीच्या तुलतेन अमेरिकेत करोनामुळे मरण पावलेल्यांची संख्या मात्र सुदैवाने लक्षणीयरीत्या कमी आहे. अमेरिकेत ज्या भागात करोनाचे रुग्ण आढळून आले तेथेच करोनाविषयक निर्बंध लागू करण्यात आले होते पण त्या राज्यांमध्ये त्याची लागण झालेली नव्हती तेथे मात्र त्या अनुषंगाने योग्य ती दक्षता घेतली गेली नसल्याने अमेरिकेलाही त्याची मोठी किंमत मोजावी लागली आहे.

या प्रसार रोखण्याचे मोठे आव्हान आता त्या देशाच्या प्रशासनापुढे आहे. त्यासाठी केली जाणारी उपाययोजना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने कमी पडत चालली असल्याचे तेथील सध्याचे चित्र आहे. मात्र, तेथील प्रशासनाने प्रयत्नांची शिकस्त चालवली असून करोनाग्रस्तांवर तातडीने आणि प्रभावीपणे उपचार सुरू आहेत. दरम्यान, अमेरिका हा करोनाग्रस्तांचा जगातील एक नंबरचा देश बनला असल्याची बाब अध्यक्ष ट्रम्प यांना मान्य झालेली दिसली नाही.

आज जाहीर आकड्यानुसार अमेरिकेतील करोनाग्रस्तांची संख्या चीनपेक्षा जास्त दिसत असली तरी चीनमधील करोनाग्रस्तांचा खरा आकडा अजून कोणालाच माहिती नाही, अशी टिप्पणी ट्रम्प यांनी केली आहे. अमेरिका येत्या ईस्टरपर्यंत म्हणजेच 12 एप्रिलपर्यंत करोना निर्बंधातून बाहेर येईल, असा विश्‍वास ट्रम्प यांनी परवाच व्यक्‍त केला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.