वॉशिंग्टन, दि. 26 – भारतातील सीरम संस्थेला कोविशिल्ड ही करोना लस तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल, तसेच अन्य कोविडविषयक मदत करण्याची तयारी अमेरिकेने दर्शवली आहे. भारतात कोविड स्थिती अत्यंत भीषण झाली असल्याने बायडेन प्रशासनाने भारताला आवश्यक असलेली सर्व मदत देण्याची तयारी दर्शवली असल्याची माहिती व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्याने दिली.
ही मदत देण्यास होत असल्याच्या विलंबावरून गेले काही दिवस बायडेन प्रशासनावर विविध घटकांकडून टीका केली जात होती.
अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॅक सुलिवन यांनी भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्याशी फोनवर संपर्क करून भारताला कोणत्या स्वरूपाची मदत हवी आहे, याची माहिती घेतली. ही मदत पुरवण्याची ग्वाहीही त्यांनी डोवाल यांना दिली.
रॅपिड डायग्नोस्टिक टेस्टिंग किट्स, व्हेंटिलेटर्स, पीपीई किट्स या सामग्रीची भारताला तातडीची गरज असल्याने त्या वस्तू तातडीने भारतात पाठवल्या जात आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन आणि उपाध्यक्षा कमला हॅरीस यांनी स्वतःच भारताच्या मदतीची ग्वाही दिली आहे. आपल्या ट्विटर संदेशात अध्यक्षांनी म्हटले आहे की, भारताने आम्हाला या आधीच्या अडचणीच्या काळात जशी मदत दिली तशीच मदत आम्हीही भारताच्या अडचणीच्या काळात त्यांना करणार आहोत.