हाफिझ सईदच्या शिक्षेबाबत अमेरिकेला आनंद

वॉशिंग्टन : “लष्कर ए तोयबा’चा संस्थापक आणि मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यामागील मास्टरमाईंड हाफिझ सईद याला पाकिस्तानमधील दहशतवाद विरोधी न्यायालयाकडून “टेरर फंडिंग’च्या दोन प्रकरणांमध्ये 11 वर्षांची शिक्षा झाल्याबद्दल अमेरिकेने आनंद व्यक्‍त केला आहे. पॅरिसमध्ये होणाऱ्या “फायनान्शियल ऍक्‍शन टास्क फोर्स’च्या महत्वाच्या बैठकीच्या पार्श्‍वभुमीवर सईदला 11 वर्षांची शिक्षा होण्यामुळे पाकिस्तानला बाजू सावरायला कारण मिळाले आहे.

या बैठकीमध्ये काळ्या यादीत टाकले जाण्याचा धोका टाळण्याच्या दृष्टीने पाकिस्तानकडून सईदचे प्रकरण सादर केले जाणार आहे. लष्कर ए तोयबा आणि जैश ए मोहम्मद सारख्या दहशतवादी संघटनांचे अर्थसहाय्य रोखण्यात अपयश आल्याबद्दल गेल्या वर्षी ऑक्‍टोबरमध्ये झालेल्या “एफएटीएफ’च्या बैठकीत पाकिस्तानला “ग्रे लीस्ट’मध्ये टाकण्यचा निर्णय झाला होता.
संयुक्‍त राष्ट्राने सईदला जागतिक दहशतवादी घोषित केले आहे आणि अमेरिकेनेही सईदवर तब्बल 1 कोटी डॉलरचे बक्षिस जाहीर केले आहे.

सईदला “टेरर फंडिंग’च्या दोन प्रकरणात शिक्षा होणे ही पाकिस्तानच्या हिताची गोष्ट आहे. पाकिस्तानकडून आपल्या भूमीचा वापर दहशतवादासाठी करू दिला जात नाही, हे यामुळे स्पष्ट होत असल्याचे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी म्हटले असल्याचे दक्षिण व मध्य आशियासाठीचे प्रभारी सहायक परराष्ट्र मंत्री ऍलिस जी वेल्स यांनी सांगितले आहे. ही एक महत्वाची कारवाई असल्याचेही त्या म्हणाल्या.

2008 च्या मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड आणि जमात-उद-दावाचा प्रमुख हाफिझ सईद याला दहशतवाद्यांच्या वित्तपुरवठ्याच्या प्रकरणात गेल्या वर्षी 17 जुलै रोजी अटक करण्यात आली होती आणि तो सध्या लाहोरच्या कोट लखपत तुरुंगात आहे.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.