वॉशिंग्टन – अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणूकीत ज्यो बायडेन यांचा विजय निश्चित झाल्यावर विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या हजारो समर्थकांनी संसदेच्या परिसरात आज अभूतपूर्व गोंधळ घातला आणि पोलिसांबरोबर त्यांचा जोरदार हिंसाचारही झाला. ( america capitol attack )
या प्रक्षुब्ध जमावाला आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांना प्रचंड कष्ट पडले. हिंसक जमावाने बुधवारी कॅपिटोल इमारतीमध्ये प्रवेश करून कार्यालयांची आणि दालनांची मोडतोड केली. याच इमारतीमध्ये अध्यक्षीय निवडणूकीच्या प्रक्रियेतील मतमोजणी आणि इलेक्टोरल कॉलेज मतांच्या प्रमाणीकरणाचे काम याच कॅपिटोलच्या इमारतीमध्ये सुरू आहे.
ट्रम्प समर्थकांनी घातलेल्या अभूतपूर्व गोंधळाच्या पार्श्वभुमीवर संसदेचे कनिष्ठ सभागृह असलेले “हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हज’ आणि सिनेट या दोन्ही सभागृहांमध्ये लॉकडाऊन करण्यात आले. तर उपाध्यक्ष माईक पेन्स आणि अन्य खासदारांना इमारतीतून सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. ( america capitol attack )
कॅपिटोल इमारतीच्या आतील भागात झालेल्या गोळीबारादरम्यान एका महिलेचा मृत्यू झाला, असे वृत्तवाहिनीने मेट्रोपोलिटन पोलिसांच्या हवाल्याने म्हटले आहे. जमावाने केलेल्या सामूहिक हल्ल्यादरम्यान कॅपिटोल इमारतीतील अनेक अधिकारी जखमी झाले आहेत.
या दंगल आणि हिंसाचाराच्या पार्श्वभुमीवर संपूर्ण राजधानीच्या परिसरात संचारबंदी लागू केली गेली. त्यानंतर कॅपिटोल परिसरात घुसलेला हिंसक जमाव हळूहळू पांगला आणि घटनास्थळापासून विखुरला. मात्र तरिही शेकडो जण ही संचारबंदी धुडकावून रस्त्यांवर निदर्शने करत थांबून राहिले होते. ट्रम्प समर्थकांनी कॅपिटोलमध्ये घुसण्यास सुरुवात केली तेंव्हाच महापौर मुरिएल बाउसर यांनी संचारबंदीची घोषणा केली होती. ( america capitol attack )
सुमारे चार तास ट्रम्प समर्थकांचा कॅपिटोलमध्ये धुडगुस सुरू होता. त्यानंतर अधिक सुरक्षा यंत्रणा बंदोबस्तासाठी दाखल झाल्यानंतर कॅपिटोल इमारत आणि आजूबाजूचा परिसर सुरक्षित झाला असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. जमावाला हुसकावून लावण्यासाठी सशस्त्र पोलीस आणि अतिरिक्त सुरक्षा दलांना पाचारण करण्यात आले होते.
ट्रम्प यांनी संसदेच्या संयुक्त बैठकीत पराभवावर शिक्कामोर्तब होण्याच्या भीतीने आपल्या स्मर्थकांना कॅपिटोलवर चाल करून जाण्यास प्रोत्साहनच दिले होते. मात्र परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागण्याची लक्षणे दिसायला लागल्यावर त्यांनी आपल्या समर्थकांना कायदा हातात न घेण्याचे आणि माघारी फिरण्याचे आवाहन केले. ( america capitol attack )