वॉशिंग्टन – अमेरिकेच्या हवाई दलाच्या एका जनरलच्या दाव्याने संपूर्ण जगाला धक्का बसला आहे. या अधिकाऱ्याचे म्हणणे आहे की, येत्या दोन वर्षांत अमेरिका आणि चीनमध्ये भयंकर युद्ध होऊ शकते. एनबीसीने दिलेल्या वृत्तानुसार, अधिकाऱ्याने याबाबत एक मेमोही पाठवला आहे. 2025 मध्ये अमेरिका आणि चीनमध्ये युद्ध होऊ शकते, असे यात म्हटले आहे. युद्धाच्या शक्यता वाढत आहेत. एवढेच नाही तर त्यांनी लष्करातील अधिकाऱ्यांना युद्धाच्या तयारीचा इशाराही दिला आहे.
वायोन्यूजमधील एका वृत्तानुसार, यूएस एअर फोर्सचे जनरल माईक मिन्हन यांनी 27 जानेवारी रोजी आपल्या अधिकाऱ्यांना एक मेमो पाठवला होता. त्यात त्यांनी म्हटले आहे की, वॉशिंग्टन पुढील 2 वर्षांत चीनशी युद्ध करू शकते. बहुधा, तैवानच्या मुद्द्यावर युद्ध होऊ शकते. एवढेच नाही तर त्यांनी लष्करालाही सज्ज राहण्यास सांगितले आहे.
हवाई दलाच्या अधिकाऱ्याचे मोठे वक्तव्य –
वायोन्यूजच्या मते, या दाव्याशी संबंधित काही कथित कागदपत्रे सोशल मीडियावर समोर आली आहेत. यानंतर पेंटागॉननेही याला दुजोरा दिला आहे. मेमोमध्ये, एअर मोबिलिटी कमांडचे प्रमुख मिन्हान म्हणाले होते की, मला वाटते की आपण 2025 मध्ये युद्ध लढू शकतो. वृत्तानुसार, हवाई दलाचे जनरल माईक मिन्हान म्हणतात की, 2024 मध्ये तैवान आणि अमेरिका या दोन्ही देशांमध्ये राष्ट्रपतीपदाच्या निवडणुका होतील. यामुळे अमेरिका ‘विचलित’ होईल. त्यामुळे चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांना तैवानबाबत पुढे जाण्याची संधी मिळणार आहे. चीनच्या भीतीचा दाखला देत जनरल म्हणाले की, संभाव्य युद्धासाठी तयार राहावे.
निवडणुकीच्या वातावरणामुळे दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण होईल, असे मिन्हान यांचे म्हणणे आहे. अशा परिस्थितीत चीन आपली रणनीती पूर्ण करण्याच्या संधीचा पुरेपूर फायदा घेण्याचा प्रयत्न करेल. तैवानच्या मुद्द्यावरून अमेरिका आणि चीन आमनेसामने आहेत. चीनच्या धमकीला न जुमानता, अमेरिकेचा स्पीकर 2022 मध्ये तैवानला पोहोचले. त्यांच्या दौऱ्यावर चीनने मोठा आक्षेप घेतला होता. जर चीन आणि अमेरिकादरम्यान युद्ध झाल्यास जगाला मोठी हानी पोहोचू शकते.