मुंबई : वर्तमानपत्रे आणि नियतकालिके घरोघरी वितरीत करण्यावर बंदी घालण्याच्या गेल्या आठवड्यातील मार्गदर्शक सूचनांमध्ये राज्य सरकारने आज दुरुस्ती केली. आता हे निर्बंध केवळ मुंबई महानगर प्रदेश आणि पुणे शहरातील हॉटस्पॉटपुरतेच मर्यादित राहणार आहेत.
दिनांक 18 एप्रिलला जारी केलेल्या अधिसूचनेमध्ये सरकारने लॉकडाऊनच्या निकषांमधून 20 एप्रिलपासून मुद्रीत माध्यमांना वगळले. मात्र वर्तमानपत्रे आणि नियतकालिकांचे घरोघरी वाटप करण्यावर बंदी घातली होती. घरोघरी वितरण जिथे जिथे होईल, तिथे तिथे याची माहिती प्राप्तकर्त्याला करून दिली जाईल.
वितरण करणाऱ्याने मास्क आणि सॅनिटायजरचा वापर करावा आणि सोशल डिस्टन्सिंगच्या निकषांचे पालन करावे, असेही सरकारने आदेशांमध्ये म्हटले आहे. मात्र मुंबई महानगर प्रदेश आणि पुणे शहरातील “कोविड-19’च्या फैलावाचे प्रमाण लक्षात घेता घरोघरी करायच्या वितरणावरील बंदी याठिकाणी आणि सर्व धोकादायक ठिकाणीही कायम असणार आहे, असेही सरकारी आदेशात म्हटले आहे.
राज्य सरकारच्या निर्णयाचा निषेध…
जनतेच्या हिताच्या बातम्या आणि घोषणांची माहिती वृत्तपत्रांच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवल्या जातात. वर्तमानपत्रांच्या हाताळनीमुळे करोना विषाणूचा प्रसार होत नसल्याचे यापूर्वी शास्त्रज्ञांनी स्पष्ट केले आहे. वर्तमानपत्रांची छपाई करताना योग्य ती खबरदारी घेतली जात असते. असे असतानाही वर्तमानपत्रे घरोघरी वितरणावर राज्य सरकारने घातलेल्या बंदीचा पुणे पत्रकार प्रतिष्ठानने निषेध केला आहे.