लॉकडाऊनबाबत पिंपरी-चिंचवड आयुक्‍तांचे सुधारित आदेश

पिंपरी – लॉकडाऊन- 5 सुरू झाल्यानंतर केंद्र व राज्यशासनाच्या निर्देशानुसार पिंपरी-चिंचवड शहरासाठी आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सुधारित आदेश काढले आहेत. त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. शहरातील सर्व व्यक्तींच्या हालचाली अत्यावश्‍यक सेवा व वैद्यकीय सेवा वगळता रात्री 9 ते सकाळी 5 या कालावधीत प्रतिबंधित केल्या आहेत. सर्व बाजारपेठांतील दुकाने सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत सुरू ठेवण्यास परवानगी दिलेली आहे. खासगी कार्यालये व माहिती तंत्रज्ञानविषयक आस्थापना जास्तीत जास्त 50 टक्के मनुष्यबळासह सुरू करता येणार आहे.

आयुक्तांच्या सुधारित आदेशानुसार, केश कर्तनालये, स्पा, सलून्स, ब्युटी पार्लर सुरू ठेवता येणार नाही. कन्टेन्मेंट झोन वगळता इतर भागातील दवाखाने, रुग्णालये, प्रसूतिगृहे, औषधी दुकाने पूर्ण कालावधीसाठी खुली राहणार आहेत. दूध, भाजीपाला, फळे, सर्व बाजारपेठांतील जीवनावश्‍यक वस्तूंची तसेच मटन व चिकन विक्रीची दुकाने सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत खुली राहणार आहेत. उद्योग शंभर टक्के कामगार क्षमतेसह सुरू ठेवता येणार आहे.

रेडझोन क्षेत्रातून येणाऱ्या कामगारांना महापालिकेची पूर्वपरवानगी बंधनकारक असेल. क्रीडा संकुल, स्टेडियम यांचे बाह्य भाग व खुली सार्वजनिक ठिकाणे पहाटे 5 ते सायंकाळी 7 पर्यंत नागरिकांसाठी खुली राहणार आहेत. कन्टेन्मेंट झोनमध्ये अत्यावश्‍यक सेवा कायम ठेवण्यासाठी आवश्‍यक वाहतूक वगळता नागरिकांना ये-जा करण्यास मज्जाव केला आहे.

बाजारपेठांमध्ये सम-विषम तारखा

शहरातील प्रमुख बाजारपेठांतील दुकाने ही सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत सम-विषम तारखांना सुरू राहतील. चिंचवडस्टेशन, पिंपरी कॅम्प, साई चौक, शगुन चौक (पिंपरी), गांधी पेठ चाफेकर चौक (चिंचवड), काळेवाडी मुख्य रस्ता (एम.एम.स्कुल ते काळेवाडी नदीवरील पूल), अजमेरा (पिंपरी), मोशी चौक, मोशी-आळंदी रस्ता, महाराणा प्रताप चौक, निगडी बसथांबा, डांगे चौक ते काळेवाडी फाटा, भोसरी-आळंदी रस्ता, कावेरीनगर मार्केट, कस्तुरी मार्केट, थरमॅक्‍स चौक ते साने चौक, दिघी जकात नाका ते मॅगझीन चौक-साईबाबा मंदिर येथील दुकाने सम-विषम तारखांना खुली राहणार आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.