योद्‌ध्यांकडून कोविड केअरसाठी रुग्णवाहिका

स्वतःच्या वापरत्या वाहनाचे रुग्णवाहिकेत रुपांतर करून केअरसाठी भेट

लोणावळा – करोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत, त्यांना एका रुग्णालयातून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी रुग्णवाहिका उपलब्ध होत नाही. नातेवाईकांना तासन्‌तास रुग्णवाहिकेचा शोध घ्यावा लागतो आहे. रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना होणारा हा त्रास टाळण्यासाठी लोणावळ्यातील डॉ. सीमा शिंदे व त्यांचे पती डॉ. सुभाष शिंदे यांनी स्वतःच्या घरात वापरात असलेल्या वाहनोच रुग्णवाहिकेत रुपांतर केले आणि टाकवे बुद्रुक येथील समुद्रा कोविड केअर सेंटरला दिली. अजून एका रुग्णवाहिकेचे काम सुरू असून, एक नवीन रुग्णवाहिका घेण्यात येणार असल्याचे डॉ. सीमा शिंदे यांनी सांगितले.

करोनाचा शिरकाव लोणावळा शहरात झाल्यापासून डॉ. सीमा शिंदे या करोना योद्धा म्हणून लोणावळ्यात काम करीत आहेत. नगरपरिषद रुग्णालयात रुग्णांना सेवा देणे, क्‍वारंटाइन सेंटरमधील नागरिकांची तपासणी, करोना रुग्ण सापडल्यानंतर त्यांच्या संपर्कातील नागरिकांची तपासणी व झालावाडी कोविड सेंटर येथील वैद्यकीय सेवा ही सर्व कामे त्या करीत आहेत. 

समुद्रा इन्स्टिट्यूट येथे नवीन कोविड सेंटर सुरू झाल्यापासून मावळ प्रांत यांच्या सूचनेनुसार येथील कामकाज डॉ. शिंदे पहात आहेत. त्याठिकाणी लोणावळा व ग्रामीण भागातील रुग्ण असतात. या रुग्णांपैकी कोणाला पुढील उपचारासाठी अन्यत्र हालवायचे असल्यास रुग्णवाहिका उपलब्ध होत नसल्याने रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना तासन्‌तास ताटकाळत रहावे लागायचे. नागरिकांची होणारी ही गैरसोय दूर करण्यासाठी डॉ. शिंदे यांनी स्वतःचे वाहन रुग्णवाहिकेत बदलून याठिकाणी उपलब्ध करून दिली आहे. कै. शांतारामबाबा शिंदे यांच्या स्मरणार्थ ही रुग्णवाहिका दिली असून, अजून दोन रुग्णवाहिका येत्या काही दिवसांत कार्यान्वित करण्यात येणार असल्याचे डॉ. शिंदे यांनी सांगितले.

वैद्यकीय साहित्यासह 20 मशीन भेट
शिंदे यांचे ओळकाईवाडी येथे पद्मावती नर्सिंग होम आहे. मात्र त्यांनी समाजसेवेसाठी स्वतःला करोना रुग्णांच्या सेवेत समर्पित करून घेतले आहे. तळेगाव लायन्स क्‍लबच्या माध्यमातून त्यांनी समुद्रा कोविड केअर सेंटरसाठी हॅन्डग्लोज, प्लस आँक्‍सिमिटर, टेंम्प्रेचर गण असे सुमारे 50 हजार रुपयांचे वैद्यकीय साहित्य मिळवून घेतले. पंचायत समिती सदस्य महादू उघडे यांनी वाफ घेण्याच्या 20 मशिन येथे भेट दिल्या.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.