कोल्हापूर /प्रतिनिधी- अवैद्यरित्या रुग्णवाहिकेतून प्रवासी वाहतूक केल्याबद्दल मालक सचिन लाड व चालक मिलिंद रेळेकर या दोघांवर शाहूपुरी पोलीसांत गुन्हा दाखल झाला.
मोटार वाहन निरीक्षक अरविंद कुंभार यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. जिल्ह्यात संचारबंदी लागू असताना २८ मार्चरोजी नोंदणीकृत रुग्णवाहिका (क्र. एम एच ०९ बी सी ६९८७) मधून कोणतीही परवानगी न घेता अवैद्यरित्या सातारा ते कोल्हापूर प्रवासी वाहतूक झाली. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. किणी टोल नाका येथील सीसीटीव्ही कॕमेरे काल ६ एप्रिल रोजी तपासले. यात २८ मार्चरोजी दुपारी ३ वाजून ४ मिनिटे १ सेंकद वाजता ही रुग्णवाहिका कोल्हापूरकडे येत असताना दिसून आली. या रुग्णवाहिकेतून प्रवास करणाऱ्या प्रवाशाला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले.
यानंतर पोलीसांनी या रुग्णवाहिकेचा शोध घेतला असता, ही रुग्णवाहिका रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली कडे जात असताना शाहूवाडीमधील मलकापूर येथे रुग्णवाहिका आणि चालकास काल ताब्यात घेतले. रुग्णवाहिकेचे मालक सचिन लाड, चालक मिलिंद रेळेकर या दोघांविरुद्ध भा दं वि सं कलम २६९, २७०, २७१ व १८८ साथीचे रोग प्रतिबंधक कायदा कलम २,३ गुन्हा दाखल करण्यात आला आहे.