शिवसेनेचे सुधीर फराटे यांची उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी
मांडवगण फराटा – शिरूर तालुक्यातील पूर्व भागातील मांडवगण फराटा व परिसरातील गावातील गंभीर रुग्नांना तातडीचे पुढील उपचार मिळण्यासाठी 108 क्रमांकाची 24 तास उपलब्ध राहणारी रुग्णवाहिका द्यावी, अशी मागणी शिवसेनेचे तालुका प्रमुख सुधीर फराटे इनामदार यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
मांडवगण फराटा या ठिकाणी 108 क्रमांकाची 24 तास रुग्णांना सेवा देणारी रुग्णवाहिका उपलब्ध व्हावी यासाठी शिवसेना उपनेते माजी खासदार, संपर्क प्रमुख शिवाजीराव आढळराव पाटील तसेच शिवसेना पुणे जिल्हा प्रमुख ज्ञानेश्वर आबा कटके यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांची मुंबई येथे भेट घेऊन निवेदन दिले. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तातडीने योग्य तो निर्णय करण्याचे प्रशासनास आदेश दिले आहेत.