पुणे महापालिकेची रुग्णवाहिका सेवा आता 24 तास

पुणे – शहरातील करोनाची गंभीर रुग्णस्थिती लक्षात घेऊन महापालिकेकडून रुग्णवाहिकेची सेवा आता 24 तास असणार आहे. त्यासाठी 56 रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्या असून, ही सेवा पूर्णपणे मोफत असणार आहे. तसेच नागरिकांना वेळेत रुग्णवाहिका मिळावी, या उद्देशाने पालिकेच्या मोटार वाहन विभागाकडून नियंत्रण कक्ष सुरू केल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. याशिवाय, करोनाबाधित मृत व्यक्‍तींसाठी शववाहिका उपलब्ध होण्यासाठी “पीएमपीएमएल’ येथे नियंत्रण कक्ष व नियोजन केले आहे.

गेल्या दोन महिन्यांपासून शहरात करोना रुग्णांची स्थिती गंभीर आहे. अशा स्थितीत नातेवाईकांना बेड मिळविण्यासाठी रुग्णवाहिका मिळविण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. त्यातच, राज्य शासनाचा 108 क्रमांक रुग्णवाहिकेसाठी असला तरी तासन्‌तास ताटकळत थांबावे लागत आहे. त्यामुळे महापालिकेने तातडीने या रुग्णवाहिकांचे नियोजन करण्यासाठी आणखी 55 रुग्णवाहिका अधिग्रहीत केल्या आहेत. त्यामुळे 101 रुग्णवाहिका शहरातील रुग्णांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

यापैकी 23 वाहने शववाहिका म्हणून, तर 78 वाहने रुग्णवाहिका म्हणून काम करणार आहेत. यामध्ये 63 रुग्णवाहिकांमध्ये ऑक्‍सिजनची व्यवस्था असून करोना नसलेल्या रुग्णांसाठी 11 रुग्णवाहिका निश्‍चित केल्या आहेत. यापैकी 56 रुग्णवाहिका चोवीस तास कार्यरत राहणार आहे. ही सर्व सुविधा विनामूल्य असून, नागरिकांनी रुग्णवाहिका मिळण्यासाठी 9689939381 किंवा शासनाच्या 108 क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.