नंदुरबार – येथील शहादा तालुक्यातील लोणखेडा अभियांत्रिकी महाविद्यालयासमोर रुग्णवाहिका पलटून झालेल्या भीषण अपघातामध्ये 14 जण जखमी झाले आहेत. धडगाव या अतिदुर्गम भागातल्या तेलखेडी प्राथमिक आरोग्य केंद्रातील 13 गरोदर महिलांना सोनोग्राफी करण्यासाठी रुग्णवाहिका निघाली असताना हा अपघात झाला. जखमींवर उपचार सुरू आहेत.
शहादा पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार धडगाव अतिदुर्गम भागातील तेलखेडी प्राथमिक आरोग्य केंद्रातून 102 रुग्णवाहिकेने 13 गरोदर माता येत होत्या. रुग्णवाहिकेच्या भरधाव वेगात चालकाचे नियंत्रण सुटले. त्यामुळे रुग्णवाहिका पलटी झाली. रुग्णवाहिकेत 13 गरोदर महिला पुरूष चालक असे 14 जण होते. हे सारेच अपघातात जखमी झाले आहेत.
अपघातानंतर खासगी रुग्णवाहिकेतून जखमींना शहादा येथील नगर पालिकेच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सर्व गरोदर मातांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली. अपघाताची बातमी समजताच पंचक्रोशीतल्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. दैव बलवत्तर म्हणून वाचलो, अशी प्रतिक्रिया यावेळी या जखमींनी व्यक्त केली.