आरोग्य केंद्रांतील रुग्णवाहिका व्हेंटिलेटरवर

रुग्णवाहिकांचा प्रस्ताव लालफितीत अडकला : पुणे जिल्ह्यातील स्थिती


जिल्ह्यातील 11 ठिकाणच्या रुग्णवाहिका होऊ शकल्या नाही दुरुस्त


शासनाकडून कार्यवाही नाही; आरोग्य विभाग उदासीन

पुणे – जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांतील बहुतांश रुग्णवाहिका “व्हेंटिलेटरवर’ असून काही रुग्णवाहिकांनी “व्हॅलीडीटी’ संपली आहे. त्यामुळे नवीन रुग्णवाहिका मिळण्याबाबत जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून राज्य शासनाला प्रस्ताव पाठविण्यात आला. त्याला आता तीन वर्षे होतील. मात्र अद्याप “लालफितीत अडकले’ल्या रुग्णवाहिकांचा प्रस्ताव पाहण्यासाठी राज्य शासनाला वेळ मिळला नाही. जिल्ह्यात मोठी दुर्घटना घडल्यावर रुग्णवाहिका मिळणार का? असा प्रश्‍न उपस्थित केला आहे.

पुणे जिल्हा परिषदेत 96 प्राथमिक आरोग्य केंद्र (पीएससी) आहेत. प्रत्येक आरोग्य केंद्रासाठी एक रुग्णवाहिका आहे; परंतु यातील काही रुग्णवाहिकांची “व्हॅलीडीटी’ संपलेली आहे. उरल्या-सुरल्या रुग्णवाहिकां वारंवार दुरूस्ती करावी लागत आहे. अशा परिस्थितीत रुग्णाला वेळेत उपचार देण्यासाठी किंवा प्राथमिक आरोग्य केंद्रांतून जिल्हा रुग्णालयात दाखल करताना डॉक्‍टर आणि रुग्णवाहिका चालकांची दमछाक होते. दरम्यान, जिल्ह्यातील 11 ठिकाणांच्या रुग्णवाहिका या दुरूस्तच होवू शकत नसल्यामुळे त्याठिकाणी नवीन रुग्णवाहिका मिळाव्या, अशा मागणीचा प्रस्ताव जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडून मुंबई येथील आरोग्य सेवा उपसंचालक आणि परिवहन विभागाचे आरोग्य सेवा उपसंचालक यांना पाठविण्यात आला होता. डिसेंबर 2016 आणि जानेवारी 2017 मध्ये याबाबत प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. मात्र, त्याबाबत राज्य शासनाकडून कोणतीच कार्यवाही झाली नसल्याचे दिसून येते.

त्यामध्ये भोर तालुक्‍यातील जोगवडी आणि नेरे प्राथमिक आरोग्य केंद्र, खेड तालुक्‍यातील कडूस, वाडा आणि वाफगाव केंद्र, वेल्हा तालुक्‍यातील करंजावणे, हवेली तालुक्‍यातील कुंजीरवाडी, इंदापूर तालुक्‍यातील निरवांगी आणि शेळगाव, मावळ तालुक्‍यातील कार्ला तसेच आंबेगाव तालुक्‍यातील लांडेवाडी केंद्रांना रुग्णवाहिकेची अत्यावश्‍यक गरज आहे. गेल्या तीन वर्षांत बंद पडलेल्या रुग्णवाहिकांची संख्या आणखीन वाढली आहे. याबाबत आरोग्य विभाग प्रशासनाकडून सांगण्यात आले की, 11 रुग्णवाहिकांचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविण्यात आला आहे. त्याबाबत पाठपुरावा सुरू असून रुग्णावाहिका लवकर मिळणे अपेक्षित आहे.

जीव गेल्यावर रुग्णवाहिका मिळणार का?
गेल्या तीन वर्षांत बंद पडलेल्या रूग्णवाहिकांची संख्या आणखीन वाढली आहे. रुग्णांचे बळी गेल्यावर रुग्णवाहिका मिळणार असा संतप्त सवाल नागरिकांमधून विचारला जात आहे. तसेच आरोग्य केंद्रांतील काही रुग्णवाहिकांची स्थिती दयनीय झाली आहे. त्यामुळे रुग्णवाहिकेअभावी रुग्णांची गैरसोय होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.